औरंगाबाद : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ विद्याधर विष्णू अर्थात वि. वि. चिपळूणकर यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. मृत्यूसमयी ते ९० वर्षांचे होते. शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यानिकेतन ही संकल्पना रुजवत ‘उद्धरावा स्वयेआत्मा’ असा मूलमंत्र देत ते त्या संस्थेचे ब्रीद व्हावे, अशी रचना व्यवस्थेत निर्माण करून देण्याची क्षमता असणारे चिपळूणकर यांनी राज्याचे शिक्षण संचालक म्हणून काम केले होते.

निवृत्तीनंतर ते औरंगाबादला स्थायिक झाले. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण व नियोजन प्रशासन संस्थेत सल्लागार म्हणूनही  काम केले होते. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  मुंबईतील विलेपार्ले येथे जन्म झालेल्या चिपळूणकरांनी १९७६ ते १९८६ या कालावधीत शिक्षण संचालक म्हणून काम केले होते. ते बालभारतीचेही संचालक होते. या संस्थेच्या उभारणीत त्यांचा मोठा वाटा होता. तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली चिपळूणकरांनी शासकीय विद्यानिकेतनची संकल्पना साकारली. निवासी शाळांसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या काळातही रात्रशाळा सुरू झाल्या. गुणवत्तेचे शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे, असा त्यांचा आग्रह असे. पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांना नापास करू नये, अशी त्यांनी केलेली सूचना राज्य सरकारने मान्य केली. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी शाळांमधील व्यवस्थापनातील बदलांसाठी प्रयत्न केले.

द्रष्टा शिक्षणतज्ज्ञ हरपला : तावडे

मुंबई : शिक्षण विभागातील अधिकारी, शिक्षक अशा सर्वानी आदर्श ठेवावा असा, राज्यातील शिक्षणाला दिशा देणारा शिक्षणतज्ज्ञ हरपला, अशा भावना शिक्षणमंत्री विनोद तावडे आणि शिक्षणतज्ज्ञांनी वि. वि. चिपळूणकर यांच्या निधनाबाबत व्यक्त केल्या.

शिक्षण क्षेत्रात विविध पदांवर काम करीत असताना त्यांनी आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने स्वत:चा वेगळा ठसा उमटविला होता. चिपळूणकर यांनी विविध शासकीय समित्यांवर काम करीत असताना नेहमीच शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी उत्तम संवाद साधला आणि वेळोवेळी शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल केले. चिपळूणकर यांच्या निधनाने शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक व अनुभवी व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे, अशा भावना तावडे यांनी व्यक्त केल्या.

अधिकारी, शिक्षक, चांगले काम करणाऱ्यांना चिपळूणकर यांच्याकडून सातत्याने प्रोत्साहन मिळत असे, असे सांगत शिक्षण विभागातील माजी अधिकारी वसंत काळपांडे यांनी चिपळूणकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. ‘प्रामाणिकपणा आणि सकारात्मकता, कार्यक्षमता या गुणांचा संगम असलेले अधिकारी क्वचितच आढळतात; असा संगम सरांच्या ठियी होता. एखाद्या माणसाच्या प्रामाणिकपणाचे त्याच्या कर्तव्यपालनापेक्षा अधिक कौतुक होत असेल तर तो कर्तव्यात चुकतो आहे असेच मानायला पाहिजे ही शिकवण चिपळूणकर सरांनी शब्दांत कोणताही उपदेश न करता आपल्या वागणुकीतून हजारो शिक्षक आणि अधिकारी यांना दिली, असे काळपांडे म्हणाले. ‘चिपळूणकर सर, बन्सल मॅडम यांसारख्या अधिकाऱ्यांची कारकीर्द हा शिक्षण विभागाचा सुवर्णकाळ होता. माझ्या सेवाकाळात मला यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना खूप शिकायला मिळाले याचे समाधान वाटते,’ अशा भावना राज्य मंडळाच्या माजी अध्यक्ष बसंती रॉय यांनी व्यक्त केल्या.

Story img Loader