राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष खासदार शरद पवार यांचा विदर्भ दौरा निश्चित झाला असून या दोन दिवसीय दौऱ्यात होणाऱ्या अपेक्षित झाडाझडतीने ज्येष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
राष्ट्रवादी कॉग्रेससाठी विदर्भ प्रांत नेहमीच कच्चा दुवा ठरला आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाचे पानीपत झाल्यानंतर तर पक्षनेतृत्वाने राष्ट्रीय व प्रदेश कार्यकारिणीसाठी या विभागातील नेत्यांचा विचारच करणे सोडून दिले. या पाश्र्वभूमीवर १७ व १८ ऑगस्टला दौऱ्यावर येणाऱ्या पवारांच्या आगमनाकडे पक्ष वर्तुळ डोळे लावून बसले आहे. या दौऱ्यात पवारांनी चार तासांचा वेळ हिंगणघाटला दिला आहे. ज्येष्ठ सहकार नेते व हिंगणघाटचे नगराध्यक्ष अ‍ॅड.सुधीर कोठारी यांच्यावर विशेष कृपादृष्टी झाली आहे. १७ ऑगस्टला दुपारी साडेबारा वाजता खासदार पवार नागपूर विमानतळावरून थेट हिंगणघाटला अ‍ॅड.कोठारी यांच्याकडे उतरणार आहेत. भोजन व विश्रांतीनंतर दुपारी दोन वाजता हिंगणघाट नगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीचा भूमिपूजन सोहळा पवारांच्या हस्ते होईल. त्यानंतर कोठारीच अध्यक्ष असलेल्या हिंगणघाट बाजार समितीच्या प्रांगणात आयोजित शेतकरी मेळाव्यास पवार संबोधतील. त्यानंतर पाच वाजता ते यवतमाळकडे रवाना होतील. तेथून १८ ऑगस्टला सकाळी ते पुसद येथे आयोजित वसंतराव नाईक स्मृतीनिमित्य कार्यक्रमात मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. हे दोन मुख्य कार्यक्रम निश्चित झाले असून वेळेवर दौऱ्यात वाढ होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
जिल्ह्य़ाच्या दृष्टीने पवारांचा हा दौरा राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावणारा ठरला आहे. जिल्ह्य़ातील पक्षाचे सर्वेसर्वा व ज्येष्ठ सहकार नेते प्रा.सुरेश देशमुख यांच्या झेंडीशिवाय आजवर पवारांचा जिल्हा दौरा कधीही झाला नाही. यावेळी अ‍ॅड.कोठारी व माजी आमदार राजू तिमांडे यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पवारांचा हिंगणघाट दौरा निश्चित केला. आमदार होण्याची महत्वाकांक्षा लपवून न ठेवणाऱ्या कोठारींचा वर्धा-चंद्रपूर या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघावर डोळा आहे. देशमुखांना मार्गदर्शक व तिमांडेंना लहान बंधू संबोधित स्वत:ची स्वतंत्र ताकद निर्माण करणाऱ्या कोठारींचा थेट ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क वाढला. त्यातूनच हा दौरा घडला, असे म्हटले जाते. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्य़ातील चारही मतदारसंघात पहिल्या तीनमध्येही या पक्षाचा उमेदवार येऊ शकला नव्हता. पुढे जिल्हा अध्यक्षपद वादग्रस्त राहिले. या दौऱ्याच्या निमित्याने माजी आमदार प्रा.देशमुख यांच्याही भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
गत वर्षभरापासून प्रकृतीला तोंड देत संपर्क सांभाळणाऱ्या देशमुखांना पवार काय कानमंत्र देतात, ही बाबही उत्सुकतेची ठरली आहे. जिल्ह्यात हिंगणघाट मतदारसंघात पक्ष व नेते मजबूत आहेत. या प्रभावाला आता पवारभेटीची किनार लाभेल. या दोन संस्थात्मक कार्यक्रमांसाठी पवार विदर्भ दौऱ्यावर येत असले तरी प्रामुख्याने विदर्भातील राजकीय परिस्थितीचाही धांडोळा घेतला जाणार आहे. यवतमाळच्या मुक्कामाकडे त्यामुळेच सर्वाचे लक्ष आहे.