सांगली : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभेचे भावी आमदार म्हणून आरआर आबांचे चिरंजीव रोहित पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आलेल्या शुभेच्छा जाहिरातीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे छायाचित्रच गायब झाले आहे. यामुळे भावी आमदार मूळच्या पक्षात राहणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षात जाणार याबाबत गुरूवारी तासगावमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

हेही वाचा >>> “बाबाजानी दुर्राणी यांची बिर्यानी खाल्याशिवाय…”, अनिल परबांनी सभागृहात सांगितला किस्सा

आरआर आबांच्या अकाली निधनानंतर गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व केले. गेली दहा वर्षे आबांचे चिरंजीव ज्युनिअर आबा म्हणून पडद्याआड कार्यरत होते. श्रीमती पाटील यांचा केवळ चेहराच पुढे होता. मागील सर्व कारभार, राजकीय तडजोडी मात्र, आबांचे बंधू तथा जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील यांच्या हातीच होता. ज्युनिअर आबा म्हणून ओळख सांगत असलेले आबांचे चिरंजीव मात्र राज्यभर केवळ भाषणबाजी करत फिरत होते.

आता वाढदिवसाचे औचित्य साधून विधानसभेच्या निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. गुरूवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदर्शित करण्यात आलेल्या जाहीरातीमध्ये केवळ भावी आमदारासोबत विद्यमान आमदार श्रीमती पाटील आणि स्व. आरआर आबांचेच छायाचित्र झळकले आहे. या छायाचित्रावर कोणत्याही वरिष्ठ नेत्याचे छायाचित्र टाळण्यात आले आहे.

हेही वाचा >>> “पेशंट म्हणून ससूनमध्ये जा”, अनिल देशमुखांच्या प्रश्नावर मुश्रीफ म्हणतात, “मी व्यायाम करून…”; विधानसभेत रंगली जुगलबंदी

दरम्यान, आबांच्या पुत्राला राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्षपद हवे होते. यासाठी  त्यांनी प्रयत्नही केले. मात्र, विद्यमान अध्यक्ष मेहबूब शेख यांच्याकडील पद काढून रोहित पाटलांना देण्यात आमदार पाटील यांचा विरोध असल्याचे सांगण्यात येते. कारण पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे प्रदेशाध्यक्ष आणि युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष एकाच जिल्ह्यात देता येणार नाही असे कारण पुढे करण्यात आल्याचे सांगण्यात आले. आमदार रोहित पवार यांचे पाठबळ आबांच्या चिरंजीवांना असल्यामुळेच लोकसभा  निवडणुकीमध्ये पक्षाचा स्टार प्रचारक म्हणून राज्यभर भाषणबाजी करण्याची संधी मिळाल्याचे समजते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी खा. शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, रोहित पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष आमदार पाटील यांच्याशी टोकाचा संघर्ष होउ लागला तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत जाण्याचा पर्याय उपलब्ध असावा या हेतूनेच त्यांनी जाहिरातीमधून वरिष्ठ नेत्यांची छायाचित्रे टाळली असल्याचे दिसते.