विधिमंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांची नाळ आजही जनतेशी घट्ट जोडलेली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून दुसऱ्यांदा पुन्हा निवडूनच येण्याची शाश्वती नसताना पंचाहत्तरी पूर्ण करणाऱ्या राज्याच्या विधिमंडळात काही सदस्यांना पस्तीस ते पन्नास वर्षांचा अनुभव आहे. आजही ते विधिमंडळाच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सभागृहात मांडतात.
 काही लोकप्रतिनिधींनी चार ते पाच दशकांपासून विधिमंडळाचे सदस्यत्व अव्याहतपणे टिकवून ठेवले आहे. अशा ज्येष्ठ सदस्यांमध्ये सोलापूर जिल्ह्य़ातील सांगोळा मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे आमदार गणपतराव देशमुख, उस्मानाबाद जिल्ह्य़ातील निलंगा विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिवाजीराव पाटील निलंगेकर, राष्ट्रवादीचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, सातारा जिल्ह्य़ातील कराड दक्षिण मतदारसंघाचे आमदार विलास बाळकृष्ण पाटील या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे.
गणपतराव देशमुख १९६२ मध्ये लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले तेव्हापासून २०१४ पर्यंत ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. लोकप्रतिनिधीपद हे फक्त सेवेसाठीच आहे, हे व्रत उराशी बाळगून आजही ते सर्वसामान्यांचे प्रश्न सभागृहात मांडतात. निलंगा विधानसभेचे मतदारसंघातील शिवाजीराव पाटील निलंगेकर आमदार म्हणून नऊ वेळा निवडून आले. गेल्या ४५ वर्षांंपासून ते काँग्रेसचे आमदार आहेत. नाशिक जिल्ह्य़ातील सुरगणा मतदार संघाचे अर्जुन तुळशीराम पवार यांनाही ४० वर्षे झाली. ते १९७२ मध्ये भारतीय क्रांती दल या पक्षाकडून निवडून आले. ते काही काळ भारतीय जनता पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राहिले. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष मधुकर पिचड यांचीही विधिमंडळ सदस्यत्वाची सलग आठवी वेळ आहे. ते १९८० मध्ये अहमदनगर जिल्ह्य़ातील अकोले मतदार संघातून काँग्रेसकडून निवडून आले होते. २००४ पासून ते राष्ट्रवादीचे आमदार आहेत. सातारा जिल्ह्य़ातील कराड दक्षिणचे आमदार विलास बाळकृष्ण पाटील १९८० मध्ये काँग्रेस पक्षाकडून निवडून आले तेव्हापासून ते विधिमंडळाचे सदस्य आहेत. आज राजकारणात येणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. स्वार्थासाठी राजकारण करणाऱ्यांना जनताच सहन करीत नाही, हा अनुभव असतानाही या ज्येष्ठ आमदारांच्या बाबतीत मात्र तसे काहीच घडलेले दिसत नाही.  

Story img Loader