जागतिकीकरणाने नवे जग, आधुनिक मानवी संस्कृती, नवा माणूस निर्माण केला आहे. ते धर्म, जात व कूपमंडूक वृत्ती मोडण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. आतापर्यंत वस्तू व भांडवलाचे जागतिकीकरण घडून आलेच आहे. आता शेवटच्या टप्प्यात माणसांचे जागतिकीकरण सुरू होणार असल्याचे म्हटले जाते. तेच जातिअंताचे अस्त्र ठरेल, असे मत ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांनी ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमात व्यक्त केले.
‘लोकसत्ता’ आणि ‘सारस्वत बँक’ यांच्या वतीने आयोजित ‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या पाचव्या पर्वात ‘सामाजिक चळवळींचा बदलता चेहरा’ या विषयावर गेले दोन दिवस चर्चा झाली. मंगळवारी, समारोपाच्या दिवशी ‘वारकरी चळवळ आणि सामाजिक वास्तव’, ‘समता की समरसता?’ आणि ‘सामाजिक मुद्दय़ांचा राजकारणावरील परिणाम’ या विषयांवर चर्चासत्रे झाली. त्यापैकी ‘समता की समरसता’ या परिसंवादात डॉ. कसबे म्हणाले, ‘‘१९९० नंतर जागतिकीकरणाच्या वाऱ्याने भारताचे आर्थिक सार्वभौमत्व संपुष्टात आले. माणसाचे जागतिकीकरण झाल्यावर आता जात, धर्म, देश या जाळय़ात आपण अडकलो तर मागे जाऊ. आता अखिल मानवजातीचा विचार करण्याची आवश्यकता आहे.’’
‘सामाजिक मुद्दय़ांचा राजकारणावरील परिणाम’ या विषयावरील सांगता सत्रात डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी जातींचे आरक्षण हे राजकारणाचा केंद्रबिंदू बनल्याचे मत प्रकट केले. ‘‘आरक्षण असलेच पाहिजे याविषयी दुमत असण्याचे कारण नाही; पण त्याला उद्योजकता विकासाची जोड देत आरक्षणाच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल,’’ असे ते म्हणाले.
‘बदलता महाराष्ट्र’च्या चौथ्या पर्वातील ‘उद्योगांचे आव्हान’ या विषयावरील पुस्तिकेचे प्रकाशन या कार्यक्रमात झाले. त्या वेळी सारस्वत बँकेचे सरव्यवस्थापक दिलीप रेगे, चित्रकार रवी परांजपे, अभय टिळक, सय्यदभाई, भारत पाटणकर, डॉ. सदानंद मोरे, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, सहायक संपादक मुकुंद संगोराम आदी उपस्थित होते.
माणसाचे जागतिकीकरण हेच जातिअंताचे अस्त्र!
जागतिकीकरणाने नवे जग, आधुनिक मानवी संस्कृती, नवा माणूस निर्माण केला आहे. ते धर्म, जात व कूपमंडूक वृत्ती मोडण्यासाठी उपयुक्त ठरले आहे. आतापर्यंत वस्तू व भांडवलाचे जागतिकीकरण घडून आलेच आहे.
आणखी वाचा
First published on: 17-09-2014 at 03:25 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Senior philosopher dr rao saheb kasbe in loksatta badalta maharashtra