सोलापूर : कोकणानंतर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात अचानकपणे मोठी घडामोड होऊन भगदाड पडले असून, माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे, माजी आमदार रतिकांत पाटील, जिल्हाप्रमुख अमर पाटील, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांच्यासह इतर मोठ्या शिवसैनिकांनी मातोश्रीवरील निष्ठेला तिलांजली देत शिवसेना एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ठाकरे गट आणखी क्षीण झाला आहे.
तथापि, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे आणि जिल्हाप्रमुख अमर पाटील या दोघांची पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवून पक्षातून हकालपट्टी केल्याचे पत्र प्रसारमाध्यमांना धाडले आहे. त्याच वेळी या दोघांनी पक्षाचा राजीनामा दिल्याचे जाहीर केले. अमर पाटील यांचे वडील, सोलापूर दक्षिणचे माजी आमदार रतिकांत पाटील आणि १९७८ पासून शिवसेनेत कार्यरत असलेले स्थानिक ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाप्रमुख साईनाथ अभंगराव यांनी सुध्दा शिवसेना ठाकरे गटातून बाहेर पडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या सर्वांचा पक्षप्रवेश झाला.
अमर रतिकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत सोलापूर दक्षिण मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून लढत दिली होती. त्या वेळी महाआघाडीतील प्रमुख मित्रपक्ष काँग्रेसने पाटील यांना पाठिंबा न देता अपक्ष धर्मराज काडादी यांच्या पाठीशी ताकद उभी केली होती. त्यामुळे शिवसेना ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोलापुरात येऊन खासदार प्रणिती शिंदे यांची कठोर शब्दांत कानउघाडणी केली होती. यातून ठाकरे गटाचा उमेदवार म्हणून अमर पाटील यांचे नाव चर्चेत आले होते. दरम्यान, अचानकपणे जिल्ह्यातील शिवसेना ठाकरे गटात दिवसभर घडामोडी घडल्या. अमर पाटील व त्यांचे वडील माजी आमदार रतिकांत पाटील यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी ठाकरे गटाची साथ सोडल्याची चाहूल लागली आणि ठाकरे गटाने अमर पाटील यांच्यासह माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा फतवा काढला. मात्र, पाटील व खंदारे यांनी आपण अगोदरच पक्षाचा राजीनामा दिल्याचा दावा केला आहे.
१९९५ साली तत्कालीन उत्तर सोलापूर राखीव मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीत प्रथमच उत्तमप्रकाश खंदारे हे युती सरकारच्या काळात युवा व क्रीडा खात्याचे राज्यमंत्री झाले होते. १९९५ ते २००४ पर्यंत सलग तीन वेळा त्यांनी आमदारकी टिकवून ठेवली होती. आपल्या राजकीय निर्णयावर भाष्य करताना त्यांनी सोलापूर जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटात गद्दारांचे साम्राज्य पसरल्याचा आरोप केला. त्यात पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप खंदारे यांनी केला.
शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख प्रा. अजय दासरी यांनी, पक्ष सोडून एकनाथ शिंदे गटात जाणारे लोभ, आमिषाला बळी पडल्याचा आरोप केला. त्यास प्रत्युत्तर देताना खंदारे यांनी, यापूर्वी शिवसेनेवरील निष्ठा पायदळी तुडवून पक्ष सोडला आणि १४ वर्षांनंतर पुन्हा पक्षात येऊन आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू लागलेत, अशा शब्दांत दासरी यांचा समाचार घेतला.