झपाटय़ाने वाढणाऱ्या पनवेल शहराची आणि नवी मुंबई परिसराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन मध्य रेल्वेने पनवेल स्थानकाचा विकास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले उचलली आहेत. या मार्गावरील प्रवाशांच्या वाढत्या संख्येच्या पाश्र्वभूमीवर पनवेल स्थानकात उपनगरीय मार्गासाठी आणखी चार प्लॅटफॉर्म उभे राहणार आहेत. हे काम मालवाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका (डीएफसी) बनवणाऱ्या एका परदेशी कंपनीच्या प्रकल्पाद्वारे पार पडणार आहे. या कामाला मध्य रेल्वेनेही हिरवा कंदील दिला आहे.
कोकण, कर्जतमार्गे पुणे या पट्टय़ात मालवाहतुकीसाठी एका परदेशी कंपनीतर्फे दोन स्वतंत्र मार्गिका पनवेलमधून जाणार आहेत. या मार्गिकांसाठी उपनगरीय मार्गावरील दोन प्लॅटफॉर्म तोडावे लागणार आहेत. या प्लॅटफॉर्मच्या मार्गातून ही स्वतंत्र मार्गिका जाईल.
मात्र हे काम करणाऱ्या आंतरराष्ट्रीय कंपनीने उपनगरीय प्लॅटफॉर्म अबाधित राहावेत, यासाठी १२ पर्याय दिले होते, असे मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सुद यांनी सांगितले. या पर्यायांपैकी उपनगरीय मार्गावरील चार प्लॅटफॉर्म वाढवण्याचा पर्याय मध्य रेल्वेला योग्य वाटत असून त्याला सैद्धान्तिक मान्यता दिल्याचे ब्रिगेडियर सूद यांनी सांगितले.
सद्यस्थितीत पनवेलला चार उपनगरीय प्लॅटफॉर्म आहेत. यापैकी दोन प्लॅटफॉर्म तोडून त्या जागेतून ‘डीएफसी’ जाणार आहेत. त्यामुळे उर्वरित दोन प्लॅटफॉर्मच्या बाजूला आणखी चार प्लॅटफॉर्म उभारले जातील. या चारपैकी दोन प्लॅटफॉर्म उन्नत असतील. त्यामुळे भविष्यात या स्थानकावरून कर्जत, रोहा आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे वाहतूक शक्य होणार आहे. उन्नत प्लॅटफॉर्म उभारल्यानंतर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल या दरम्यान प्रस्तावित हाय स्पीड कॉरिडॉरचा पर्यायही खुला आहे.
उपनगरीय प्लॅटफॉर्मबरोबरच लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठीही मध्य रेल्वेने योजना आखली आहे. या योजनेला याआधीच हिरवा कंदील मिळाला आहे. या योजनेअंतर्गत आणखी तीन प्लॅटफॉर्म उभारण्यात येणार आहेत. त्याशिवाय एक पीट लाइन (देखभाल दुरुस्तीसाठीची मार्गिका) सुरू करण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे.
‘डीएफसी’ का नको उन्नत?
मालवाहतुकीसाठी स्वतंत्र उन्नत मार्गिका बांधण्याचा विचार केल्यास त्यासाठीचा खर्च जास्त आहे. हा खर्च आवाक्याबाहेर जाण्याची शक्यता आहे. या मार्गिकेमधून शंभर डब्यांच्या मालगाडीबरोबरच डबल डेकर मालगाडय़ाही चालवल्या जाणार आहेत. उन्नत मार्गिकेवर चढण्यासाठी या मालगाडय़ांना अधिक शक्तिशाली इंजिनाची गरज आहे.
ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद, महाव्यवस्थापक (मध्य रेल्वे)