गिरणी कामगार कर्मचारी व निवारा कल्याणकारी कर्मचारी संघटनेत सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात उभी फूट पडली आहे. वेंगुर्ले येथे झालेल्या गिरणी कामगारांच्या बैठकीत सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघ अशा नवीन संघटनेची निर्मिती करून तिच्या जिल्हाध्यक्षपदी दिनकर मसगे यांची घोषणा करण्यात आली. गिरणी कामगार कर्मचारी व निवारा कल्याणकारी कर्मचारी संघामध्ये सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष दिनकर मसगे यांची संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली असल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच वेंगुर्ले येथे गिरणी कामगारांची बैठक झाली. त्या बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त करून नवीन संघटनेच्या नावाची घोषणा करण्यात आली. सावंतवाडी व वेंगुर्ले तालुक्यातील गिरणी कामगारांनी सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघटनेची दिनकर मसगे यांच्या अध्यक्षतेखाली नवीन संघटना स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जिल्ह्य़ातील सर्व कामगारांना या नव्या संघटनेच्या माध्यमातून एकत्रित आणून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे ठरविण्यात आले. गिरणी कामगारांच्या प्रश्नांसाठी दिनकर मसगे यांनी उचल घेऊन मुंबई व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात कायमच कामगारांच्या प्रश्नावर आवाज उठविला असल्याने त्यांची हकालपट्टी झाली असली तरी सिंधुदुर्ग गिरणी कामगार संघाची स्थापना करून भव्य मेळावा घेण्याचे निश्चित करण्यात आले. मोफत घरांची लॉटरी लागलेल्या आणि प्रतीक्षेत असणाऱ्या गिरणी कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच आक्रमक राहण्याची भूमिका दिनकर मसगे यांनी जाहीर केले. त्यामुळे गिरणी कामगार कर्मचारी निवारा कल्याणकारी संघटनेत उभी फूट पडली आहे. या वेळी दिनकर मसगे, शामसुंदर कुंभार, आपा परब, शरद परब, लॉरेन्स डिसोझा, विश्वनाथ सावंत, यशवंत सावंत, नारोजी कदम, दीपाली परब यांच्यासह सुमारे ६५ गिरणी कामगार व त्यांचे वारस वेंगुर्ले येथे झालेल्या बैठकीत उपस्थित होते.

Story img Loader