Suresh Dhas On Santosh Deshmukh Murder Case : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे कुटुंबीय,भाऊ धनंजय देशमुख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी या प्रकरणात कुणालाही सोडणार नाही, तसेच आरोपींवर कठोर कारवाई होणार, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. या भेटीवेळी भाजपाचे आमदार सुरेश धस हे देखील उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. कोणी कितीही मोठा असला तरी संतोष देशमुख प्रकरणात सहभाग असणाऱ्या एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले.
दरम्यान यावेळी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीबद्दल सुरेश धस यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना धस म्हणाले की, “धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी आम्ही येथे आलो नव्हतो”. पुढे बोलताना सुरेश धस म्हणाले की, “मुळात संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा २०१९ च्या निवडणुकीत प्रितम मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे. त्याचवेळच्या निवडणुकीत नमिता मुंदडा यांचा बूथ प्रमुख आहे. कालच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बूथ प्रमुख आहे आणि आत्ताच्या निवडणुकीत नमिता मुंदडा यांचा परत बूथ प्रमुख आहे. आमच्या भाजपाचा बूथ प्रमुख हरवला आहे. बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीत अनन्य साधारण महत्व आहे. त्याच्यापुढं कोणी कोणताही… मी नाव कोणाचं घेणार नाही, पण सहभाग असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही बिनभाड्याच्या खोलीत जावं लागेल, राजीनामा ही नंतरची गोष्ट आहे”, असे सुरेश धस म्हणाले.
हेही वाचा>> संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट; ‘या’ मुद्द्यांवर झाली चर्चा
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची मागच्या महिन्यात अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. या प्रकरणातील संशयित मास्टरमाईंड वाल्मिक कराड हा ३१ डिसेंबरला पोलिसांना शरण आला आहे. दरम्यान वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंचा अत्यंत जवळचा माणूस आहे. त्यामुळे धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण काय?
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचं ९ डिसेंबर २०२४ रोजी अपहरण करण्यात आलं आणि त्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर केज आणि मस्साजोग या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांसह मस्साजोगच्या ग्रामस्थांनीकडू या हत्या प्रकरणाचा लवकरात लवकर तपास करुन आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.