राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविषयीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्याने वादात सापडलेल्या अभिनेत्री केतकी चितळेने तिच्यावर बेतलेल्या एका न विसरू शकणाऱ्या प्रसंगाबद्दल माहिती दिलीय. तसेच साडी नेसली असताना ब्लाऊड खेचत विनयभंग झाल्याचा गंभीर आरोप केलाय. तसेच याबाबत तक्रार करूनही पोलिसांनी एफआयआर नोंदवली नसल्याचंही म्हटलं. ती गुरुवारी (१४ जुलै) एबीपी माझाशी बोलत होती.
केतकी चितळे म्हणाली, “मी जेव्हा कळंबोली पोलीस स्टेशनमधून ठाणे पोलिसांच्या कस्टडीत जात होते, तेव्हा जी काही मारहाण झाली, विनयभंग झाला, मी साडी नेसली होती त्यामुळे ते अधिकच वाईट होतं. कारण ब्लाऊज खेचला जात होता. मारण्यात येत होतं, शाईच्या नावाखाली केमिकल रंग फेकण्यात आला. हा रंग माझ्याच नाही, तर पोलिसांच्याही अंगावर फेकण्यात आला. अंडे फेकण्यात आले. ही गोष्ट मी कधीच विसरू शकणार नाही.”
“पोलिसांनी विनयभंगाची एफआयआर नोंदवून घेतली नाही”
“पोलीस स्टेशनच्या आवारात एवढा जमाव जमा होतोय हे कळंबोली पोलिसांना कसं कळलं नाही? हा प्रश्न मला नेहमी पडतो. मी याबाबत तक्रार केली, मात्र पोलिसांनी एफआयआर नोंदवून घेतली नाही. यावर काय बोलावं. आम्ही यावरही कायदेशीर मार्गाने लढत आहोत,” असं केतकी चितळेने सांगितलं.
“मला वॉरंटशिवाय बेकायदेशीरपणे घरून उचलून पोलीस कस्टडीत टाकलं”
ती वादग्रस्त पोस्ट का शेअर केली यावर बोलताना केतकी चितळे पुढे म्हणाली, “सगळेच लोक सोशल मीडियावर स्क्रोल करताना पोस्ट कॉपी पेस्ट करतात. मीही त्याच भावनेतून ती पोस्ट कॉपी पेस्ट केली. त्यानंतर मला वॉरंटशिवाय बेकायदेशीरपणे घरून उचलून पोलीस कस्टडीत टाकण्यात आलं.”
“…तोपर्यंत लढा संपला असं म्हणूच शकत नाही”
“मला जामीन मिळाला तेव्हा खरी लढाई सुरू झाली. कारण न्याय जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत लढा संपला असं म्हणूच शकत नाही. ज्या बेकायदेशीर गोष्टी घडल्या त्या इतरांसोबत घडू नये यासाठी मला जास्त लढायचं आहे,” असंही केतकीने सांगितलं.
हेही वाचा : “…मग पोलीस मला अटक कशी करु शकतात?”; पोलीस, सत्तेचा गैरवापर होत असल्याचा केतकीचा आरोप
“अरे एक टक्का तरी द्या मला”
“मी २०१९ ला माझ्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ अपलोड केला होता. तो अनेक युट्युबर्सने स्वतःच्या चॅनेलवर अपलोड केला. त्यांनी प्रचंड पैसे कमावले. अरे एक टक्का तरी द्या मला. विनोदाचा भाग सोडून देऊ, पण माझ्यावर खालच्या पातळीवर ट्रोल करणाऱ्या कमेंट झाल्या त्यापेक्षा जास्त घाण व्यक्तिगत मेसेज २०१९ पासून येत आहेत. त्यामुळे घरच्यांनाही ट्रोलर्स अजून किती खाली घसरणार आहेत असा प्रश्न पडतो,” असंही केतकीने नमूद केलं.