शिंदे गटातील नेते रामदास कदम यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “माझ्याबाबतीतही तेच केलं. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यावर माझी भाषणं बंद करून टाकली,” असा आरोप रामदास कदम यांनी केला. तसेच आपलाच आमदार, आपलाच मंत्री, आपलाच नेता तो मेला तरी चालेल, पण त्याला झेड सुरक्षा द्यायची नाही, असं उद्धव ठाकरेंचं धोरण असल्याचाही आरोप केला. ते शुक्रवारी (७ ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलत होते.
रामदास कदम म्हणाले, “माझ्याबाबतीतही तेच केलं. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यावर माझी भाषणं बंद करून टाकली. कारण मला जास्त टाळ्या मिळतात. माझा माध्यमांकडे जाण्याचा रस्ता बंद करून टाकण्यात आला. तुम्ही माध्यमांशी बोलायचं नाही असं सांगण्यात आलं. माझं बसण्याचं आसन क्रमांक बदलून टाकलं. शिवसेना प्रमुख गेल्यावर माझ्याशी सुडाने वागण्यात आलं. माझ्या मुलाच्या माध्यमातून सूड उगवला.”
“आपलाच आमदार, मंत्री, नेता मेला तरी चालेल, पण…”
“एवढंच नाही, तर एकनाथ शिंदेंना नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या त्यावेळी तत्कालीन गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तातडीने झेड सुरक्षा देण्याचे आदेश दिलं. उद्धव ठाकरेंनी शंभुराजे देसाई गृहराज्यमंत्री असताना सकाळी आठ वाजता फोन केला आणि एकनाथ शिंदेंना झेड सुरक्षा द्यायची नाही, असं सांगितलं. म्हणजे आपलाच आमदार, आपलाच मंत्री, आपलाच नेता तो मेला तरी चालेल, पण त्याला झेड सुरक्षा द्यायची नाही,” असं रामदास कदम यांनी सांगितलं.
“हिंमत असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना भिडावं”
रामदास कदम पुढे म्हणाले, “गुलाबराव पाटलांना जास्त टाळ्या मिळतात, मग त्यांना कोणत्याही कार्यक्रमाला बोलवायचं नाही. इतर पक्षांमध्ये कार्यकर्त्यांना मोठं करण्याचं काम होतं. उद्धव ठाकरे कोणालाही थोडी प्रसिद्धी मिळाली, टाळ्या मिळाल्या तर त्याला संपवण्याचा प्रयत्न करतात. दसऱ्याला एकनाथ शिंदेंना संपवण्याच्या प्रयत्नात ते त्यांच्या नातवापर्यंत पोहचले. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी एकनाथ शिंदेंना भिडावं.”
“गद्दार, खोके यावर शेंबडं मुलंही विश्वास ठेवणार नाही”
“अनेक मंत्र्यांनी उद्धव ठाकरेंनी कसे खोके घेतले त्याचे आरोप केले. त्याची उत्तरं ते देत नाहीत. त्यामुळे गद्दार, खोके यावर शेंबडं मुलंही विश्वास ठेवणार नाही. यांचं महाराष्ट्रात हसं होतंय. गुवाहटीला गेले सर्व आमदार माझ्या एका शब्दावर परत यायला तयार होते. फक्त तुम्ही राष्ट्रवादीला सोडा आणि तुमच्यासोबत येतो असं ते म्हणाले. परत येण्याची तयारी दाखवली. खोके घेतले असते तर त्यांनी परत येण्याची तयारी दाखवली नसती,” असं रामदास कदम यांनी सांगितलं.
हेही वाचा : “मनोहर जोशी उद्धव ठाकरेंच्या पाया पडले, पण त्यांनी…”, रामदास कदमांचा गंभीर आरोप
“उद्धव ठाकरेंच्या पाया खालची वाळू घसरली आहे”
“उद्धव ठाकरेंनी स्वतःचं पाप लपवण्यासाठी, मुख्यमंत्रीपदावरून खाली उतरावं लागलं म्हणून ते आमदारांना बदनाम करत आहेत. यावर महाराष्ट्रातील शेंबडं मुलही विश्वास ठेवणार नाही. म्हणून मी याचा निषेध करतो. दीड वर्षाच्या मुलावरही उद्धव ठाकरे बोलू शकतात. ते इतके खाली येऊ शकतात. त्यांचा तोल गेला आहे. त्यांच्या पाया खालची वाळू घसरली आहे,” असा आरोप कदमांनी केला.