वाघ किंवा बिबटय़ाच्या हल्ल्यात ठार झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील एकाला नोकरीत सामावून घेण्याच्या निर्णयाला तत्वता मान्यता मिळाली असून यासंदर्भातील आदेश लवकरच काढण्यात येईल अशी घोषणा वन खात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी यांनी आज येथे केली. या घोषणेमुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना आता नोकरी व आर्थिक मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
 ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील गावांमध्ये वाघ व बिबटय़ाने धुमाकूळ घातला असून २५ दिवसात ८ जणांचे बळी घेतल्याने गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.  पायली व भटाळीच्या घटनेनंतर तर गावकऱ्यांनी वन कर्मचाऱ्याला झाडाला बांधून मारहाण केली आणि जंगल जाळले. गावकऱ्यांचा हा संताप बघून वन अधिकारी प्रचंड तणावात आहेत. बिबटय़ाचा बंदोबस्त करा नाही तर आम्हीच त्याला ठार करू इथवर गावकऱ्यांची मजल गेली आहे. त्यातूनच आज वन खात्याचे प्रधान सचिव प्रवीण परदेशी व भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आज ताडोबाच्या बफर झोनमधील किटाळी, भटाळी, पायली, चोरगांव, पदमापूर व आगरझरी या गावाला भेटी देवून गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी गावकऱ्यांसोबत बैठक घेवून बिबटय़ाला जेरबंद करण्याचे आश्वासन देतांनाच भविष्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना वन खात्यात नोकरी देण्याच्या प्रस्तावाला तत्वता मान्यता दिल्याची घोषणा केली.   वन खात्यात दरवर्षी ५०० जागासाठी नोकर भरती प्रक्रिया राबविण्यात येते. राज्याचा विचार केला तर वर्षांला वन्यप्राण्यांचे ३० ते ४० हल्ले होतात. यातील हल्ल्यात मृत पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकाला नोकरी देण्याचा प्रस्ताव आहे.
आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच वन्यजीव विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक नकवी व या परिसरातील सर्व वनाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव लावून धरला होता. या प्रस्तावावर वन खात्याने सकारात्मक निर्णय घेतला असून अध्यादेश निघताच त्याची अंमलबजावली होईल असेही ते म्हणाले. यासोबतच वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ठार झालेल्यांना यापूर्वी केवळ दोन लाख रूपये आर्थिक मदत तसेच मृतकाच्या कुटूंबाला दहा हजार व जखमीला पाच हजाराची तातडीची आर्थिक मदत देण्यात येत होती. आता मृतकाच्या कुटूंबाला २५ हजार व जखमीला १५ हजाराची तातडीची आर्थिक मदत देण्यात येणार आहे.  
व्याघ्र प्रकल्प तसेच जंगल परिसरात राहणाऱ्या लोकांचा शेती वगळता दुसरा कुठलाही व्यवसाय नाही. अशा लोकांना रोजगार कसा मिळेल, त्यांचा आर्थिक स्त्रोत कसा वाढेल या दृष्टीनेही वन खाते प्रयत्न करीत आहे.
ताडोबा व्याघ्र प्रकल्पात धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ाचा शोध आज तिसऱ्या दिवशीही लागलेला नाही. वन खात्याने या नरभक्षक बिबटय़ाला गोळय़ा घालण्याचे आदेश दिल्यापासून शार्प शुटर त्याचा या परिसरात शोध घेत आहे. मात्र हा बिबट शार्प शूटरला चकमा देवून गायब झाल्याने शुटरवर जंगलात भटकण्याची वेळ आली आहे.

Story img Loader