विवाहितेच्या छळप्रकरणी औरंगाबाद येथील प्रतिष्ठित ठेकेदाराच्या कुटुंबातील चौघांना येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. देशमुख यांनी सक्तमजुरी व दंडाची शिक्षा सुनावली. खटल्याच्या निकालास १५ वर्षे २ महिने १३ दिवसांचा कालावधी लागला.
शहरातील प्रतिष्ठित शेतकरी बाळासाहेब बोर्डे यांची मुलगी लीना हिचा विवाह २ मे १९९५ रोजी औरंगाबाद येथील प्रसिद्ध ठेकेदार रामचंद्र दत्तात्रय चौधरी यांच्याशी झाला. विवाह सोहळय़ापूर्वी सासरच्या लोकांनी ५० हजार रुपये रोख व मारुती कारची मागणी केली. ही मागणी पूर्ण करणे शक्य नसल्याने त्यांनी लग्नानंतर मी तुमची मागणी पूर्ण करीन, असे सांगितले. त्यानंतर विवाह सोहळा झाला. लग्नानंतर लीना हिचा छळ सुरू करण्यात आला. त्यामुळे येथील न्यायालयात खासगी फिर्याद वकील बाबा शेख यांच्यामार्फत दाखल केली.
खटल्याच्या सुनावणीत लीना, बाळासाहेब बोर्डे, शिवाजीराव बोर्डे यांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. लीना ही सासरी नांदत असताना तिला होणाऱ्या त्रासाबद्दल व छळाबद्दल तिने नातेवाइकांना पाठविलेली पत्रे पुरावा म्हणून सादर करण्यात आली. तो ग्राह्य धरण्यात आला. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. देशमुख यांनी आरोपी रामचंद्र दत्तात्रय चौधरी, इंदुमती दत्तात्रय चौधरी यांना दोन वर्षे सक्तमजुरी व २५ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने सक्तमजुरी तसेच नणंद डॉ. सरिता अरुण टेकाळे हिला सहा महिने सक्तमजुरी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या दंडातून फिर्यादी लीना हिला झालेल्या त्रासाबद्दल ५० हजार रुपये देण्याचा आदेश दिला. खटल्यात लीना हिच्या वतीने विधिज्ञ बाबा शेख, शबाना शेख, रुबीना शेख व सुजाता िभगे यांनी काम पाहिले. खटल्यातील आरोपी व फिर्यादी हे राजकीयदृष्टय़ा प्रतिष्ठित असल्याने निकालाकडे सर्वाचे लक्ष लागले होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा