पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिचा बळजबरीने गर्भपात केल्याच्या कारणावरून पतीसह सासू व सास-यास न्यायालयाने २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा दिली. आरोपी पाथडी तालुक्यातील सुसरे येथील आहेत.
जिल्हा सत्र न्यायाधीश एस. के. एस. रिझवी यांनी हा आदेश दिला. पती पांडुरंग कचरू कराळे, सासरा कचरू भानुदास कराळे व सासू चंद्रभागाबाई कचरू कराळे या तिघांना दोषी धरून शिक्षा देण्यात आली. सरकारतर्फे सरकारी वकील पुष्पा गायके-कापसे यांनी काम पाहिले. तिघाही आरोपींना भादंवि कलम ३१३ व ३१६ अन्वये प्रत्येकी २ वर्षे सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा देण्यात आली आहे.
चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा पांडुरंग व सासरची मंडळी छळ करत होती. ती गरोदर असल्याचे समजल्यावरून २१ सप्टेंबर २००९ रोजी तिला एका अवैधरीत्या गर्भपात करणा-या महिलेकडे घेऊन गेले. परंतु त्या महिलेने चार महिन्यांचा गर्भ असल्याने गर्भपाताचे औषध देण्यास नकार दिला. परंतु पांडुरंगसह सासू व सासरे या तिघांनीही पत्नी मेली तरी चालेल, असे म्हणत ते औषध पत्नीला बळजबरीने पाजले. पत्नीला त्रास होऊ लागल्याने तिने माहेरी वडिलांना फोन करून बोलावून घेतले. वडिलांनीच तिला नगरच्या सरकारी रुग्णालयात दाखल केले, तेथे तिचा गर्भपात झाला. या खटल्यात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले.

Story img Loader