राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निरंजन डावखरे यांनी बुधवारी आमदारकीचा राजीनामा दिला असून ते राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश करणार हे स्पष्ट झाले आहे. निरंजन डावखरे हे कोकण पदवीधर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. राष्ट्रवादीचे दिवंगत नेते वसंत डावखरे यांचे ते चिरंजीव असून वडिलांच्या निधनानंतर ते राष्ट्रवादीत एकाकी पडल्याची चर्चा होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या वेळच्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांनी भाजपाला हादरा देत विजय मिळवला होता. ते पाचही जिल्ह्यातील पदवीरधर मतदारापर्यंत पोहोचण्यात यशस्वी ठरले. पण वडिलांच्या निधनानंतर ते पक्षात एकाकी पडल्याची चर्चा होती. ते पक्षावर नाराज असल्याचे सांगितले जात होते. ठाण्यात आमदार जितेंद्र आव्हाड गटाचे वर्चस्व निर्माण झाल्याने पक्षाकडून दुर्लक्ष होत असल्याची भावना निरंजन डावखरेंच्या मनात होती, असे देखील सांगितले जाते.

अखेर बुधवारी निरंजन डावखरे यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या स्थानिक पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून मी पक्षातून बाहेर पडत आहे. मी आमदारकीचा राजीनामा दिला असून यापुढील वाटचाल लवकरच जाहीर करेन, असे त्यांनी म्हटले आहे.  निरंजन डावखरे हे भाजपात प्रवेश करणार हे स्पष्ट झाले आहे. गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ते भाजपात प्रवेश करतील, असे सूत्रांनी सांगितले.