औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा लाजीरवाणा पराभव झाल्यामुळे खैरेंच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे. गुलमंडी वॉर्डातून भाजपचे बंडखोर राजू तनवाणी यांनी सचिन खैरे यांचा पराभव केला.
चंद्रकांत खैरे यांचे निवासस्थान असलेल्या या वॉर्डातून शिवसेनेने त्यांचे पुतणे सचिन खैरे यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी नेते किसनचंद तनवाणी यांचे बंधू राजू तनवाणी यांनी बंडखोरी केली होती. त्यामुळे या वॉर्डातून कोण विजयी होणार, याकडे औरंगाबादकरांचे लक्ष लागले होते. पुतण्याच्या विजयासाठी स्वतः चंद्रकांत खैरे यांनी गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमध्ये ठाण मांडले होते. त्यांनी अनेक शिवसैनिकांना यासाठी कामाला लावले होते. मात्र, महापालिकेमध्ये शिवसेना-भाजप युती पुन्हा सत्ता मिळवणार असल्याचे स्पष्ट होत असताना खैरे यांच्या पुतण्याला बंडखोर उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
दरम्यान, या पराभवानंतर काहीवेळ गुलमंडी भागामध्ये तणावाचे वातावरण होते. या भागातील दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली. शिवसैनिकांनीच त्यांना दुकाने बंद करायला लावल्याचा आरोप करण्यात येतो आहे. या भागातील सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात आली आहे.
पुतण्याच्या पराभवाने चंद्रकांत खैरेंच्या प्रतिष्ठेला धक्का
औरंगाबाद महापालिका निवडणुकीत शिवसेना नेते आणि खासदार चंद्रकांत खैरे यांचे पुतणे सचिन खैरे यांचा लाजीरवाणा पराभव झाल्यामुळे खैरेंच्या प्रतिष्ठेला धक्का बसला आहे.
First published on: 23-04-2015 at 01:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Setback for chandrakant khaire in aurangabad