सांगली : उमदी (ता. जत) जवळ मोटार अडवून चालकासह सराफाला मारहाण करून अडीच कोटींची लूट करणाऱ्या सात जणांना घटनेनंतर २४ तासांत गजाआड करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी बुधवारी सायंकाळी पत्रकार बैठकीत दिली.
अनिल कोडग हे सराफ व्यावसायिक उमदीतून विजयपूरला मारूती ब्रिंझा मोटारीतून चालकासह निघाले असताना मोरबगी गावाच्या अलीकडे पुलावर मारूती स्विप्टमधून आलेल्या चोरट्यांनी काठी व लोखंडी सळीने मारहाण करून रोख रक्कम, सोन्याची अंगठी, मोबाईल व मोटार असा २ कोटी ५६ लाख ३८ हजारांचा ऐवज लंपास केला होता. चालकाच्या पायावर दगडाने मारून जखमी केले होते. ही घटना मंगळवारी पहाटे साडेतीन वाजणेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी उमदी (ता. जत) पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक नितीन सावंत यांच्या नेतृत्वाखाली एक व उमदी पोलिसांचे एक अशी दोन पथके तैनात करण्यात आली होती. आज तांत्रिक गोपनीय माहितीच्या आधारे सात जणांना अटक करून त्यांच्याकडून चोरीस गेलेली रोकड, मोटार व सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात यश आले.
अटक करण्यात आलेल्यांमध्ये रवि सनदी (वय ४३, रा. उमदी), अजय सनदी (वय ३५ रा. मूळ उमदी, सध्या विजयपूर), चेतन पवार (वय २०, विजयपूर), लालसाब होनवाड (वय २४, रा. उमदी), सुमित माने (वय २५, रा. पोखणी, जि. सोलापूर) आणि साई जाधव (वय १९, रा. उमदी) या सात जणांचा समावेश आहे.
तांत्रिक माहितीचे विश्लेषण व बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे विजयपूर रोडवर झेंडे वस्ती येथे थांबलेले आहेत, अशी माहिती मिळाली. पथकाने सापळा रचून तिघांना अटक केली. त्यांनी जबरी चोरी केल्याचे मान्य केले.
दरम्यानच्या काळात उमदी पोलीस ठाणेकडील हवालदार संतोष माने यांना बातमीदाराकडून आणखी काही जण या गुन्ह्यात सहभागी असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे उमदी येथील चडचण रोड माळावरती चार जणांना ताब्यात घेतले. त्यांचाही यामध्ये सहभाग असल्याची कबुली दिली.
संशयित साई जाधव हा फिर्यादी यांचेकडे काही दिवसांपूर्वी कामाला असल्याने फिर्यादी हे त्यांचे कारमधून पैसे घेवून जात असलेबाबत त्यास माहिती होते, तो चालकाचा मुलगा आहे. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीमुळे सराफाला लुटण्याची योजना अंमलात आणण्यात आली. संशयितांनी चोरलेली ब्रीज मोटार, रोख रक्कम, अंगठी हा मुद्देमाल विजयपूरमध्ये ठेवण्यात आला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला असल्याचे श्री. घुगे यांनी सांगितले.