नक्षलवाद्यांनी आज गडचिरोलीत हल्ला केला. जिल्ह्यात आज सकाळी नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या साहाय्याने पोलिसांची गाडी उडविल्याने सात पोलीस शहीद झाले आहेत.
जिल्ह्यातील चार्मोशी तालुक्यातील मुरमुरीजवळ नक्षलवाद्यांनी भूसुरुंगाच्या सहाय्याने सी ६० पथकाच्या पोलिसांच्या गाडीवर हल्ला केला. माओवाद्यांनी भुसुरुंगाच्या साहाय्याने पोलिसांची सुमो गाडी उडविली. यात नक्षवादविरोधी दलाचा एक कमांडो शहीद झाल्याचेही वृत्त आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले असून, जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय विभागाचा अध्यक्ष, तसेच या चळवळीसाठी देशपातळीवर समन्वयाचे काम करणाऱ्या दिल्ली विद्यापीठातील प्रा.जी.एल.साईबाबा याला अहेरीच्या प्रथमश्रेणी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायाधीश एन.जी.व्यास यांनी त्याला २३ मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. साईबाबाच्या अटकेने नक्षल चळवळीला देश-विदेशातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या बुध्दीवंतांची नावे समोर येण्याची शक्यता आहे.त्यामुळे साईबाबाच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाल्याचे वर्तविण्यात येत आहे.