गडचिरोली जिल्ह्य़ाच्या चामोर्शी तालुक्यातील येदनुर, मुरमुरी व पवीमुरांडा या गावाला जोडणाऱ्या पुलाजवळ नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात सी-६० पथकातील सात पोलीस जवान शहीद झाले, तर दोघे गंभीर जखमी झाले. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास घडलेली ही घटना महाराष्ट्रातील पोलीस दलावर २०१०नंतर झालेला सर्वात मोठा नक्षली हल्ला आहे. नक्षलवाद्यांच्या आंतरराष्ट्रीय समितीचा प्रमुख प्रा. जी. एल. साईबाबा याच्या अटकेनंतर अवघ्या तीन दिवसांतच हा हल्ला करण्यात आल्याने त्याच्याशी या हल्ल्याचा संबंध जोडण्यात येत आहे.
गडचिरोलीपासून ३० किमी अंतरावर असलेल्या चामोर्शी तालुक्यात नक्षलवादी दाखल झाल्याची माहिती मिळाल्यानंतर तीन दिवसांपूर्वी सी-६० पथकातील ७० जवान येथील पवीमुरांडा गावी दाखल झाले होते. या जवानांनी येदनुर, मुरमुरी, पवीमुरांडा व परिसर पायी पिंजून काढला. ही शोधमोहीम संपवून जवान रविवारी परतणार असल्याचे समजल्यानंतर नक्षलवाद्यांनी येदनुर व मुरमुरी या दोन गावांमधील पुलाजवळील रस्त्यावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग पेरून ठेवले. रविवारी सकाळी जवानांच्या गाडय़ांचा ताफा तेथून जात असताना ताफ्यातील तिसरी गाडी नक्षलवाद्यांनी स्फोटाने उडवून दिली. हा स्फोट इतका भीषण होता की सुमो २०-२५ फूट उंच हवेत उडाली व तिच्या ठिकऱ्या झाल्या. यात सात पोलीस जवान शहीद झाले व दोघे जखमी झाले. बाकीच्या गाडय़ांतील जवानांनी पोलिसांच्या मदतीने जखमी व मृतांना हलवले. दोघा जखमी जवानांच्या डोक्याला जबर दुखापत झाली असली तरी त्यांच्या जीविताला धोका नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा