लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : महापालिकेच्यावतीने शनिवारी आयोजित केलेल्या महास्वच्छता अभियानाअंतर्गत सांगली व मिरज शहरांना जोडणारा रस्ता स्वच्छ करत सुमारे सात टन कचरा संकलित केला. आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्यासह महापालिकेतील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी या अभियानात सहभाग नोंदवला.

महापालिकेतील दोन्ही शहरांना जोडणारा प्रमुख मार्ग आज स्वच्छता अभियानासाठी निश्चित करण्यात आला होता. यामध्ये २० ठिकाणे निश्चित करण्यात आली होती. या मोहिमेमध्ये आयुक्त श्री. गुप्ता यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे, शिल्पा दरेकर, शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण, आरोग्यधिकारी डॉ. रवींद्र ताटे, प्रशासन व्यवस्थापक नकुल जकाते, जनसंपर्क तथा मालमत्ता अधिकारी धनंजय हर्षद यांच्यासह सहायक आयुक्त सहदेव कावडे, डॉ. प्रज्ञा त्रिभुवन, सचिन सांगावकर, अनिस मुल्ला यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला.

आणखी वाचा-सांगली जिल्हा परिषदेतील पर्यवेक्षक, कनिष्ठ सहायक लेखाधिकारी निलंबित

या मोहिमेसाठी आरोग्य, स्वच्छतेबरोबर कार्यालयीन असे १४०० कर्मचारी सहभागी झाले होते. सांगलीतील कर्मवीर भाऊराव पाटील चौक ते मिरज मिशन येथील गांधी चौक या प्रमुख मार्गांवर ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.