मोहनीराज लहाडे
नगर : सात वर्षांत जिल्ह्यतील २ हजार १२७ महिला व पुरुषांसह अल्पवयीन मुलामुलींचा अद्यापि शोध लागलेला नाही. त्यासाठी पोलिसांनी अनेक शोधमोहिमा राबवल्या. मात्र हे सर्व जण अजूनही बेपत्ताच आहेत. यामध्ये हरवलेल्या, घरातून निघून गेलेल्या व्यक्तींसह पळवल्या गेलेल्या, अपहरण झालेल्या मुलामुलींचाही समावेश आहे. अर्थातच महिला व मुलींचे प्रमाण त्यामध्ये अधिक आहे.
जिल्हा पोलीस दलाकडून ही माहिती उपलब्ध झाली. गेल्या वर्षी सन २०२० मध्ये हरवलेल्या, पळवलेल्या, अपहरण झालेल्या २०० मुलींपैकी ७७ मुलींचा शोध पोलिसांनी घेतला. त्याचबरोबर १२१० महिलांपैकी ६२१, १०९१ पुरुषांपैकी ३९० असे एकूण २२०१ व्यक्तींपैकी १०८८ जणांचा शोध पोलिसांनी लावला. तरीही १८५९ व्यक्ती व १६८ मुला—मुलींचा शोध सन २०१५ पासून लागलेला नाही.
अल्पवयीन मुले-मुली घरातून निघून गेले, हरवले, बेपत्ता झाले तरीही त्यांचे अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करून पोलिसांकडून शोध घेतला जातो.
सन २०१५ पासून ही पद्धत राबवली जात आहे. लहान मुलांचा शोध घेण्यासाठी ‘ऑपरेशन मुस्कान’ या नावाने आत्तापर्यंत ९ मोहिमा राबवल्या गेल्या. त्यासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात स्वतंत्र अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले जाते. मात्र तरीही शोध न लागलेल्या व्यक्ती व मुलामुलींची संख्या मोठी आहे.
पोलिस अधिकाऱ्यांच्या मतानुसार प्रेमप्रकरणातून मुली घरातून निघून जाण्याचे, मुलांबरोबर पळून जाण्याच्या मोठय़ा घटना आहेत. याशिवाय आई—वडील रागावले, त्यांनी दुसरे लग्न केल्याने सावत्रपणातून मिळणारी वागणूक, वडिलांना दारू पिण्याचे व्यसन, घरची गरिबी, छानशौकीत राहण्यासाठी लागलेली चटक, वाममार्गाने पैसे मिळवणे आदी कारणांनीही मुलेमुली घर सोडून जातात. मुले हरवण्याचे प्रमाण कमी असले तरी अल्पवयीनांचे अपहरण झाल्याच्याही काही घटना आहेत.
मुलींचे प्रमाण अधिक
सन २०१५ पासून अल्पवयीन मुलामुलींचे अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्याच्या घटनांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक आहे. असे एकूण १३५ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये ११६ मुली, तर मुलांची संख्या केवळ १९ आहे. त्यामध्ये शून्य ते ७ वयोगटातील तीन मुले, ७ ते १२ मधील पाच मुले व पाच मुली, १२ ते १६ मधील ६१ मुले व ७९ मुली, १६ ते १८ वयोगटातील ५ मुले व ३२ मुली आहेत. आई बरोबर तिची लहान मुले घरातून निघून जाण्याचे, त्यांचे बेपत्ता होण्याचे प्रमाणही मोठे आहे. अशा घटनांमध्ये एकूण २१३ अल्पवयीन मुले बेपत्ता झालेली आहेत. हरवलेल्या व्यक्तींसाठी १ जून २०२१ पासून सुरू केलेल्या शोध मोहिमेत, गेल्या तीन दिवसात दोन पुरुष व १६ महिला असे १८, तर दोन मुले व चार मुली अशा अल्पवयीन ६ जणांचा पोलिसांनी शोध लावला.
हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षात आता स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रौढ महिला—पुरुष घरातून बेपत्ता किंवा निघून गेल्यानंतर ते परतल्याच्याही अनेक घटना आहेत. मात्र संबंधित कुटुंबे याबद्दलची माहिती पोलिसांना कळवत नाहीत. त्यामुळे नियंत्रण कक्षात स्थापन करण्यात आलेल्या कक्षातून कर्मचारी रोज संबंधित पोलीस ठाणे व कुटुंबांना फोन करून त्याची माहिती घेणार आहेत. याशिवाय अल्पवयीन मुलामुलींचा शोध घेण्यासाठी ‘मुस्कान—१०’ ही शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी पोलीस उपअधीक्षक, स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते, बालगृहे बालरक्षण समिती, बालसुरक्षा कक्ष यांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
—मसुद खान, पोलीस निरीक्षक, नियंत्रण कक्ष.