रवींद्र जुनारकर
जंगल आणि माणूस यांचे सहजीवन अनादीकाळापासूनचे, पण लोकसंख्या वाढत गेली आणि माणसांच्या राहण्याचा प्रश्न उद्भवला. माणसांची राहण्याची व्यवस्था आणि विकास यासाठी जंगल अतिक्रमित होऊ लागले. त्याचा परिणाम मानव-वन्यजीव संघर्षांत होत गेला. गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून हा संघर्ष कमी होण्याऐवजी वाढत आहे. यात वन्यप्राण्यांचा तर बळी गेलाच आहे, पण गेल्या सात वर्षांत तब्बल २६२ लोकांचा बळी यात गेला आहे. तर चार हजारांच्या आसपास लोक गंभीर जखमी झाले आहेत.
राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी पाच विदर्भात आहेत. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या २००च्या वर आहे. उन्हाळय़ात मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला जातो. वनोपजांसाठी गावकरी जंगलात जातात. पहाटेची वेळ ही वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीची असते आणि त्याच वेळी गावकरीही जंगलात जातात. त्यातून संघर्ष पेटतो. चंद्रपूर, यवतमाळ व गडचिरोली या तीन जिल्हय़ांत मानव- वन्यजीव संघर्षांत वाढ झाली आहे. माणसे जंगलात आणि वन्यप्राणी गावात अशी परिस्थिती आहे. जंगल आणि गाव यातील अंतर कमी झाल्यामुळे साहजिकच वाघ, बिबटे आणि इतर वन्यप्राणी जंगलाची सीमा ओलांडून गावात प्रवेश करत आहेत. यात अनेकदा गावातील जनावरे त्यांची शिकार ठरत आहेत. बरेचदा ते जंगलालगतच्या शेतात मुक्काम ठोकतात. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. चंद्रपूर, वर्धा, नागपूर या जिल्ह्य़ांत तर वाघ मानवी वस्तीतदेखील शिरकाव करत आहे. वाघ वाढले की जंगल कमी होत आहे की आणखी काही कारण, पण वाघांनी आता राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, नद्या ओलांडायला सुरुवात केली आहे. सहसा वाघ हा त्याचे अधिवास क्षेत्र सोडून बाहेर जात नाही. तर जंगलालगतचे गावकरी मात्र सरपण आणण्यासाठी तसेच गुरे चराईसाठी जंगलात जातात. गावकऱ्यांना जंगलात जाण्यासाठी मनाई केली असतानाही ते जंगलात जातात, पण गावकऱ्यांनाही उपजीविकेसाठी दुसरे साधन नाही, हेदेखील तेवढेच खरे आहे. वाघाच्या अधिवास क्षेत्रात मानवी हस्तक्षेप होत असल्याने मानव-वन्यजीव संघर्षांत वाढ झाली आहे. जंगलातील वन्यप्राण्याची शिकार करणाऱ्या वाघाला आता मानवी रक्ताचीही सवय झाली आहे.
ब्रह्मपुरी येथील वान्द्रा येथे आजोबांसोबत शेतावर गेलेल्या जय चंद्रकांत धंदरे या आठ वर्षीय चिमुकल्यावर बिबटय़ाने हल्ला करून गंभीर जखमी केले. आजोबांना जयचा रडण्याचा आवाज येताच त्यांनी जयकडे धाव घेऊन आरडाओरड केली असता बिबटय़ाने पळ काढला. तर चंद्रपूर शहराचे प्रवेशद्वार असलेल्या यशवंतनगर येथे पहाटेला वाघाने हल्ला करून एका गायीला ठार केले. त्यामुळे शहरातसुद्धा दहशत निर्माण झाली होती.
वन्यप्राणी-मानव संघर्षांत सात वर्षांत जसा २६२ लोकांचा बळी गेला तसाच २२ वर्षांत किती तरी वाघ मृत्युमुखी पडले आहेत. जंगलाशेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांनी वाघांवर विषप्रयोग करून तसेच तारांमध्ये विद्युत प्रवाह सोडूनही वाघांची शिकार केली आहे. मानव-वन्यजीव संघर्षांत आतापर्यंत चार वाघांना गोळय़ा घालून ठार मारण्यात आले. ब्रह्मपुरी तालुक्यातील मुधोली त्यानंतर तळोधी, पोंभूर्णा व गोंदियात नवेगांव येथे या घटना घडल्या.
कारखाने व उद्योगांनी वाघांचा अधिवास असलेल्या जंगलात प्रवेश केला आहे. यवतमाळ जिल्ह्य़ातील झरी जामनीचा सिमेंट कारखाना, चंद्रपूर जिल्हय़ातील वेकोलिच्या कोळसा खाणी या जंगलात किंवा जंगलालगत आहेत. धरण व तलावही जंगलात आहेत. त्यामुळे या घटना आणखी वाढणार आहेत. त्यावर वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा हा संघर्ष हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.
– प्रा. डॉ. योगेश दुधपचारे, विन्यजीव अभ्यासक