१९३ कोटींचा निधी राज्य शासनाकडे जमा; प्रकल्पाचा खर्च एनटीपीसी उचलणार
‘स्मार्ट सिटी’ योजनेअंतर्गत सोलापूर शहरासाठी केंद्र सरकारकडून पहिल्या टप्प्यात १९३ कोटींचा निधी मंजूर होऊन राज्य शासनाकडे जमा झाला आहे. या पाश्र्वभूमीवर स्मार्ट सिटी योजनेच्या पहिल्या टप्प्यात सांडपाणी प्रक्रिया करणारा ‘टर्सरी’ प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पात प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा पुनर्वापर सोलापूरजवळील एनटीपीसीच्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पासाठी करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रकल्पाचा खर्च एनटीपीसी उचलणार आहे.
याशिवाय घनकचरा व्यवस्थापनासह वाहनतळांची व्यवस्था आदी विविध आठ कामांना प्राधान्य देण्यात येणार आहे.
स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार स्थापित झालेल्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या संचालकांची बैठक महापालिकेत झाली. या वेळी कंपनीचे अध्यक्ष तथा पालिका आयुक्त विजय काळम-पाटील यांच्यासह जिल्हाधिकारी रणजितकुमार, पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर, महापौर प्रा. सुशीला आबुटे, पालिका स्थायी समितीचे सभापती रियाज हुंडेकरी, पालिका सभागृहनेते संजय हेमगड्डी, विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे तसेच नगररचना विभागाचे सहसंचालक प्रकाश भुकटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे (पुणे), क्रिसील कंपनीचे पार्थिव सोनी, सनदी लेखापाल आनंद गावडे, पालिकेच्या सहायक आयुक्त तथा कंपनीच्या कार्यकारी संचालिका अमिता दगडे-पाटील आदी संचालकांची उपस्थिती होती.
सोलापूरजवळ आहेरवाडी (ता. दक्षिण सोलापूर) येथे एनटीपीसीमार्फत सुमारे १३ हजार कोटी खर्चाचा औष्णिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पासाठी उजनी धरणातून थेट जलवाहिनी योजनेतून वर्षांतून दोन टीएमसी पाणी उचलले जाणार आहे. या जलवाहिनी योजनेचे काम प्रगतिपथावर असतानाच इकडे सोलापुरातील पाणीपुरवठय़ाची स्थिती पाहता उजनी धरण ते सोलापूर समांतर जलवाहिनी योजना उभारणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने एनटीपीसी प्रकल्पासाठी उभारण्यात येणाऱ्या जलवाहिनी योजनेचा वापर सोलापूर शहराच्या पाणीपुरवठय़ासाठी करावा आणि त्या मोबदल्यात सोलापुरातील सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याच्या पुनर्वापरासाठी टर्सरी प्रकल्प उभारण्याची आणि हे प्रक्रिया केलेले पाणी एनटीपीसी प्रकल्पासाठी देण्याची योजना शासनाने मान्य केली आहे. सोलापूरसाठी पाण्याची निकड पाहता हे काम प्राधान्याने हाती घेतले जाणार आहे.
‘स्मार्ट सिटी’साठी सोलापुरात सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प
१९३ कोटींचा निधी राज्य शासनाकडे जमा; प्रकल्पाचा खर्च एनटीपीसी उचलणार
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2016 at 01:47 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sewage processing project in solapur