वसंत मुंडे, बीड
निरक्षरता आणि परिस्थितीची प्रतिकूलता यामुळे रोज जीवनसंघर्षांला सामोरे जाणाऱ्या शब्बीरभाईंचं लहानसं अंगण म्हणजे प्रतिगोकुळच जणू! गेली अनेक वर्षे तिथे मायेने पाळलेल्या शेकडो गायीगुरांचा वावर आहे. अशा ‘गोपालक’ शब्बीरभाईंना ‘पद्मश्री’ने गौरविले गेले खरे, पण तरी ‘गोपालना’साठी सुरू झालेला त्यांचा जीवनसंघर्ष काही थांबलेला नाही!
शिरुर तालुक्यातील दहीवंडी या गावात पत्र्याच्या दोन खोल्यांच्या रंग उडालेल्या घरात शब्बीरभाई हे पत्नी अशरबी, मुलगा रमजान, युसूफ, सून रिजवाना आणि अंजूम तसेच नातवंडे असा तेरा सदस्यांचा परिवार राहतो. इतक्या छोटय़ा जागेतील या तीन कुटुंबांची रोजची सकाळ पोट भरण्याच्या चिंतेसहच उगवते. ही पोटापाण्याची चिंता केवळ स्वत:पुरती नसते, तर त्या शेकडो गायीगुरांसाठीही असते.
केंद्र सरकारने पद्मश्री जाहीर केलेल्या शब्बीर सय्यद उर्फ शब्बीर मामू यांचे हे वास्तव चित्र. साधी अक्षर ओळखही नसलेल्या शब्बीर मामूंना पुरस्कार म्हणजे वर्तमानपत्रात छायाचित्र येणे, एवढेच माहीत. त्यामुळे पद्मश्री मिळाल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावरील गायीवासरांच्या पोटापाण्याची चिंता काही ओसरलेली नाही. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही, फारशी कोणाकडून मदतही नाही. अशा कठीण परिस्थितीत ५० वर्षांपेक्षा अधिक काळ शेकडो गायींचा सांभाळ शब्बीरभाई करीत आहेत.
सय्यद शब्बीर सय्यद बुडन असे त्यांचे नाव असले तरी ‘गायी पाळणारे शब्बीरमामू’ हीच ६५ वर्षे वयाच्या शब्बीर यांची खरी ओळख आहे. यंदाच्या पद्मश्री किताब जाहीर झालेल्यांच्या यादीत शब्बीरमामूंचे नाव झळकले आणि माध्यमांपासून दूर असलेल्या दहीवंडी गावाकडे नजरा वळल्या.
वयाच्या दहाव्या वर्षी वडिलांनी दोन गायी हवाली करत त्यांची ‘जान से भी ज्यादा हिफाजत’ करण्यास, अर्थातच प्राणांपलीकडे त्यांचा सांभाळ करण्यास सांगितले. पाच एकर कुसळी रान, गायी सांभाळणे, वाढवणे हेच मग शब्बीर मामूंचे ध्येय बनले. ‘गोहत्या’, ‘गोरक्षण’, ‘गोशाळा’ असे कोणतेही शब्ददेखील माहीत नसताना, केवळ वडिलांनी सांगितले म्हणून कत्तलखान्याकडे जाणाऱ्या गायींना सोडवून आणून त्यांचा सांभाळ करणे हेच त्यांचे जीवन बनले.
गायींची संख्या वाढत गेल्याने दोन्ही मुलांची शाळाही अर्ध्यावरच सुटली. शब्बीर मामूंचे कुटुंब मुलानी असल्याने ‘हम मांगकर के खाते है, अपने लिऐ नही गायों के लिए’ असे सूत्र शब्बीर मामूंचं आहे. गावगाडय़ात मुलानी समाज हा कोंबडे, बकरे कापून द्यायचा आणि त्या बदल्यात गावाने त्यांना धान्याच्या खळ्यावरून धान्य द्यायचे, असा रिवाज. त्यामुळे ज्यांचा उदरनिर्वाह केवळ पशुहत्येवर चालतो त्याच समाजातील शब्बीर यांचे जीवनसूत्र मात्र ‘गोरक्षण’ बनल्याने एका खेडेगावात पद्मश्री कसा पोहोचला याचे कोडे सहज उलगडत जाते.
सकाळी उठून गायींना डोंगर रानात चरायला घेऊन जाणे. सायंकाळी घरी आणून त्यांना बांधणे हाच शब्बीर मामूंचा दिनक्रम. सध्या शंभरपेक्षा जास्त गायी दारात असताना ते दूधही काढत नाहीत. गायींच्या वासरांसाठी ते त्या दुधावर पाणी सोडतात. गायीचे गोऱ्हे शेतकऱ्यांना दिल्यानंतर त्या बदल्यात चारा आणि पैसे घेतात. त्यातून वर्षांकाठी गोऱ्ह्य़ांचे साधारणत: पन्नासएक हजार रुपये उभे राहतात. तर शेणापासून वर्षांला लाखभर रुपयांची गाठ पडते. हेच या १३ सदस्यीय कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधन. शेतकऱ्याला गोऱ्हे दिल्यानंतर ते कत्तलखान्याला द्यायचे नाही असे ते बजावून सांगतात. मागच्या ५० वर्षांत शेकडो गायींना कत्तलखान्यात जाण्यापासून वाचवत त्यांचे पालनपोषण करण्याचे त्यांचे काम सुरू आहे. दुष्काळात चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागत असला तरी वडिलांच्या शब्दाखातर कठीण प्रसंगातही गायी सांभाळण्याचे काम चालूच आहे. कुठलीही हौस, मौज नाही किंवा गावाला जाणेही नाही. त्यामुळे शब्बीर मामूंच्या या गायी सांभाळण्याच्या कामाला अनेकांनी वेडय़ातही काढलं.
त्यांनी गायींसाठी मदत करण्याचे आवाहन वेळोवेळी केले असूनही कोणी फारशी मदत केली नसल्याने शब्बीर मामूंच्या रोजच्या जगण्याचा आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा संघर्ष पद्मश्री जाहीर होऊनही चालूच आहे.
यंदा चारा पाण्याचा प्रश्न कठीण
यावर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे अनेक शेतकरी गायी आणून आम्हाला देत आहेत. मात्र आहे त्याच गायींचा पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाऊस नसल्याने यंदा डोंगरातही चारा नाही, पाणीही मागच्या वर्षीचेच आहे. घरी दोन बोअर आहेत, त्यातून पिण्यापुरतेच पाणी येत असल्याने लहान वासरांना त्यातलेच पाणी पाजतो. तर काही म्हाताऱ्या गायींसाठी शेजाऱ्यांकडून पाणी घेतो. आणखी आठ दिवस पाणी पुरेल नंतर परिस्थिती कठीण आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना भेटून आम्ही दावणीला चारा देण्याची मागणी केली आहे. नाम फाउंडेशनने काही चारा दिल्यामुळे सध्या म्हाताऱ्या आणि वासरांना संध्याकाळी चारा दिला जातो. मात्र आता सरकारने सोय केली पाहिजे, अशी मागणी शब्बीर मामू यांचा मुलगा युसूफ याने केली.