गोवा राज्यातील मायनिंग खाणींची चौकशी करणाऱ्या शहा आयोगाने रेडीतील खाणींची चौकशी करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यामुळे गोव्यापाठोपाठ सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खाण उद्योजकांत खळबळ उडाली आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात रेडी या ठिकाणी सुमारे पन्नास वर्षे मायनिंग खाण उद्योग सुरू आहे. रेडीतील खाणीबाबतचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे मागितला असल्याने खाण विभागाची धावपळ उडाली आहे. रेडीतील खाण उद्योगात गोवा येथील काही उद्योजक आहेत, असा अंदाज शहा आयोगाला आहे. त्यामुळे रेडी समुद्राजवळ असणाऱ्या या खाण प्रकल्पाची चौकशी होणार आहे. रेडीमध्ये खाण उद्योगाची मोठमोठी विवरे आहेत. शिवाय काही खाणमालकांनी समुद्राच्या पातळीशी जाऊन उत्खनन केल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबत हा आयोग काय चौकशी करतो याकडे सर्वाचेच लक्ष वेधले आहे.
गोव्यात खाण कंपन्यांच्या चौकशीच्या वेळी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील खाणीसंबंधींची माहिती पुढे आली. त्यामुळे या खाण उद्योगाची चौकशी होईल. सध्या कळणे, रेडी, सातार्डा तर्फे साटेली या ठिकाणी खाण उद्योग सुरू आहे. तिरोडा खाण उद्योगाला पर्यावरण मुद्दय़ावर स्थगिती आहे.
सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ले तालुक्यातील भागात खाण उद्योग सुरू आहेत. त्याची शहा आयोग चौकशी करेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. या आयोगाच्या टीमने चौकशी सुरू केली आहे. या ठिकाणी स्वत: शहा येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली.शहा आयोग पर्यावरणविषयक दाखले, लीज, उत्खनन व सर्व बाबींची चौकशी करील, असे जिल्हा प्रशासनाला वाटते. त्यामुळे खनिकर्म विभागाने तशी तयारी ठेवली आहे.