मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. शिवसेना पक्ष शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थकांमध्ये विभागला गेला आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना सातत्यांने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटातील आमदार गद्दार असल्याचा आरोप केला जातोय. याच टीकेला शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी रोखठोक उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांच्यावर काही संस्कार केलेले आहेत की नाही? की लहानपणी ते गल्लीबोळात फिरत होते, असी खरमरीत टीका शहाजीबापूंनी आदित्य ठाकरेंवर केली आहे.
हेही वाचा >>> “जे.पी. नड्डा असे म्हणालेले नाहीत” भाजपा अध्यक्षांच्या ‘त्या’ विधानानंतर फडणवीसांचे स्पष्टीकरण
“उद्धव ठाकरे काही शब्द बोलले तर तो आमदारांच्या जिव्हारी लागणार नाही. पण आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणे चुकीचे आहे. सर्व आमदारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण आपल्या घरात वडीलधाऱ्यांना आदराने, सन्मानाने बोलतो. हा संस्कार आपल्याला आईने बालपणी दिलेला असतो. या पोराला काय शिकवलंय ते समजत नाही. हे पोरगं बाहेर गल्लीत हिंडत होतं, हेही समजत नाही,” असे शहाजीबापू पाटील म्हणाले. याबाबतचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
हेही वाचा >>> “ममता बॅनर्जी, केसीआर माझ्या संपर्कात,” विरोधकांच्या एकजुटीवर उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
“आदित्य ठाकरेंना ही भाषा अजिबात शोभत नाही. ठाकरी भाषा फक्त बाळासाहेब ठाकरेंची होती. ही भाषा उद्धव ठाकरेंची तसेच आदित्य ठाकरेंचीही नाही. कुठल्याही नेतृत्वाने जनतेसमोर जाताना उपजत गुणांना घेऊन जावे. अनुकरण नको. अनुकरण करणारे नेतृत्व टिकलेले नाही. तसेच ते लोकांना आवडतही नाही. तुम्हाला बाळासाहेबांचा वारसा आहे. त्यामुळे तुम्हाला हा सन्मान मिळाला आहे,” असेही शहाजीबापू पाटील आदित्य ठाकरेंना उद्देशून म्हणाले.
हेही वाचा >>> उद्धव ठाकरेंनी संजय राऊतांच्या कुटुंबीयांची भेट घेताच फडणवीसांची ४ शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…
“बाळासाहेब ठाकरे यांचे नातू या नात्याने आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत आहेत. आदित्य ठाकरे हे लोकांचे नेतृत्व म्हणून फिरत नाहीत. ठाकरे नावाचे लेबल त्यांच्यापासून बाजूला केले, तर आदित्य ठाकरेंची ५० लोकांची सभा होणे कठीण आहे. एका बाजूला गद्दार म्हटले जात आहे आणि दुसरीकडे या-या म्हणत आहेत. आता आम्ही तुम्हाला कशाला हवे आहोत. अजिबात वाट पाहायची नाही. आम्हाला गद्दार म्हणून नका. अजूनही वेळ गेलेली नाही. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या कुटुंबाचा सन्मान राखतो,” असेदेखील शहाजीबापू यांनी आदित्य ठाकरेंना सुनावले.