“बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला”, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर केली होती. एकनाथ खडसेंच्या या टीकेवर शहाजीबापू यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्याकरिता ते आज शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले होते. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
हेही वाचा – “ते माझ्या मतदारसंघात येत असतील तर…” उद्धव ठाकरेंच्या सांगोला दौऱ्यावरून शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया
नेमकं काय म्हणाले शहाजी बापू?
“एकनाथ खडसे यांना माझ्या मर्दांनगीचं वेड का लागले आहे, त्यांनी माझी मर्दांनगी तपासू नये. त्यांनी त्यांच बघावं, हा माझ्या जीवनात घडलेला एक अपघात आहे. पराभवाच्या काळातील मी माझे दुःख मित्राला सांगत होतो. ते व्हायरलं झालं. गणपतराव देशमुखांसारख्या नेत्याच्या विरोधात मी लढत होतो. त्यामुळे मला संसाराकडे लक्ष देता आलं नाही”, असे प्रत्युत्तर शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ खडसे यांना दिले आहे. तसेच “सरकारी संपत्तीवर ढापा मारून मी संसार केला नाही. माझे हात पापाने बरबटलेले नाहीत”, असा टोलाही त्यांनी एकनाथ खडसे यांना लगावला आहे.
काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
शिवसेनेतील बंडानंतर शहाजीबापू पाटील हे आमदारांसह गुवाहाटीला गेले असता त्यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यावेळी त्यांनी ‘बायकोला साडी घेण्यासाठी सुद्धा आपल्याकडे पैसे नव्हते’, असं विधान केलं होतं. या विधानावरून “बायकोलाही साडी घेऊ शकत नाही, तो मर्द कसला”, अशी टीका एकनाथ खडसे यांनी शहाजी बापूंवर केली होती.