विरोधी पक्ष राज्यातील सरकार कधी कोसळेल याबाबत भाकितं करत असल्याची विधानं गेल्या तीन वर्षांत अनेकदा ऐकायला मिळाली आहेत. तशी ती आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांतही ऐकायला मिळाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याविषयी सूचक विधानं केली. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली असून यासंदर्भात शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी खोचक टीका केली आहे.
काय म्हणाले जयंत पाटील?
आज शिर्डीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय ‘मंथन शिबिरा’ला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी मोठा दावा केला. “राष्ट्रवादी काँग्रेसचं अधिवेशन संपल्यानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळेल”, असा दावा जयंत पाटील यांनी केला. त्यासंदर्भात पत्रकारांनी विचारणा केली असता अजित पवारांनी “या सरकारला १४५ आमदारांचा पाठिंबा आहे तोपर्यंत हे सत्तेत राहतील”, असं म्हणत आकडेवारीबाबत विधान केलं. त्यामुळे शिंदे सरकार कधीपर्यंत सत्तेत राहणार? याविषयी चर्चा सुरू झालेली असताना त्यावरून टीव्ही ९ शी बोलताना शहाजीबाापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर शिंदे-फडणवीस सरकार पडणार”, जयंत पाटील यांचं मोठं विधान!
शहाजीबापू म्हणतात, “अशी भाकितं…”
“अशी भाकितं यापूर्वी अनेकदा करण्यात आली आहेत. १९९५ साली जेव्हा मी पहिल्यांदा काँग्रेसकडून आमदार झालो, तेव्हा ५ वर्षं शरद पवार आम्हाला सांगायचे की पुढच्या महिन्यात सरकार पडणार. पण मनोहर जोशींचं सरकार काही केल्या पडलं नाही. आम्हाला निवडणुकीला सामोरं जावं लागलं. आताही सरकार पडणार असं म्हणत यांच्या पक्षाचे जे लोक शिंदे गट आणि भाजपाकडे निघून चालले आहेत, त्यांना अडवण्यासाठी अशी भीती दाखवणारी विधानं केली जात आहेत”, असं शहाजीबापू पाटील म्हणाले.
“अजित पवार-शरद पवार ही मोठी माणसं”
दरम्यान, अजित पवारांच्या विधानावरही शहाजीबापू पाटील यांनी खोचक टोला लगावला आहे. “अजित पवार किंवा शरद पवार ही मोठी राजकारणी माणसं आहेत. ९५ सालीही अजित पवारांनी सरकार पाडलं नाही. तेव्हा कुठे गेले होते ते? कुठल्या गावाला गेले होते अजित पवार? पाडायचं होतं की सरकार. त्या वेळी एवढंसं सरकार होतं. शिवसेना-भाजपाच्या १०० जागाही नव्हत्या. ते तुम्हाला पाडता आलं नाही. आता खणखणीत १७५ आमदारांचं बहुमत असलेलं सरकार आहे. ते आता तुम्ही पाडायला लागले आहात. तुम्ही एवढे बुद्धीवान आहात का? उगीच त्यांचे कार्यकर्ते अडवण्यासाठी ते करत आहेत”, असं शहाजीबापू म्हणाले.
“…तरच हे सरकार जाईल”, राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या भाकितानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
“प्रत्येकाला स्वत:च्या अस्तित्वाचा प्रश्न असतोच. त्यासाठी प्रत्येक नेता वेगवेगळी भूमिका घेत असतो. अनेकजण भविष्यात वेगवेगळी भूमिका घेत असल्याचं दिसून येईल”, असं सूचक विधानही शहाजीबापू पाटील यांनी यावेळी बोलताना केलं.