Shahaji Bapu Patil On Uddhav Thackeray: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरच्या आमदारांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची साथ सोडल्यापासून दोन्ही गट सातत्याने एकमेकांवर टीका आणि आरोप-प्रत्यारोप करत असतात. अशात माजी आमदार राजन साळवी यांनी उद्धव ठाकरे यांना सोडून एकनाथ शिंदेंच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर दोन्ही शिवसेनेचे नेते एकमेकांवर जोरदार टीका करत आहेत. अशात कोकणातील ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवही नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याबाबत सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकारांनी विचारले असता, काही दिवसांनी आदित्य ठाकरेच उद्धव ठाकरे यांना सोडायची भाषा करतील, असे विधान केले आहे. दरम्यान पाटील यांच्या या विधानाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
तिथे थांबण्यात काही अर्थ नाही
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघात आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजेनेच्या कामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यानंतर शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, “कालच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची वास्तवता परिस्थिती अशी झाली आहे की, तिथे थांबण्यात काही अर्थ नाही अशी भावना झाली आहे. एक दिवस असा उगवेल की उद्धव साहेबांना सोडायची भाषा आदित्य ठाकरेच करतील.”
निकृष्ठ काम करणारा विरोधी पक्षनेता म्हणून…
यावेळी पत्रकारांनी शहाजीबापू यांनी आदित्य ठाकरे यांचे विरोधी पक्षनेता म्हणून नाव पुढे येत असल्याचे म्हटले, तेव्हा ते म्हणाले की, “असे काहीही होणार नाही. कारण त्यांच्याकडे संख्याबळच नाही. पण त्यांना हे पद दिले तर महाराष्ट्रात अतिशय निकृष्ठ काम करणारा विरोधी पक्षनेता म्हणून नाव गाजेल.”
विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटलांचा परभव
दरम्यान नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शहाजीबापू पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला होता. सांगोला विधानसभा मतदारसंघात झालेल्या तिरंगी लढतीत शेतकरी कमागार पक्षाच्या बाबासाहेब देशमुख यांनी पाटील यांचा सुमारे २५ हजार मतांनी पराभव केला होता. दरम्यान एकनाथ शिंदे यांच्याबरोबर गेलेल्या आमदारांपैकी बहुतांश आमदार विधानसभा निवडणुकीत पुन्हा विजयी झाले होते. मात्र, शहाजीबापू पाटील यांना पराभवाचा फटका सहन करावा लागला होता.