मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकतेच अयोध्या दोऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांच्याबरोबर शिंदे गटाचे आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी आणि अनेक कार्यकर्तेही अयोध्यानगरीत गेले होते. या दौऱ्यात शिंदे गटाबरोबर काही गुंडांना नेल्याचीही माहिती समजत आहे. याच मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीकास्र सोडलं.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गुंडांची टोळी घेऊन अयोध्येला गेले. ते अयोध्यानगरीत शक्तीप्रदर्शन करायला गेले होते की प्रभू रामाच्या दर्शनाला गेले होते?” असा सवाल राऊतांनी विचारला. तसेच या दौऱ्यात एकनाथ शिंदे गटाचे काही आमदार गेले नाहीत. शिंदे गटातील एक गट अस्वस्थ असल्याचंही संजय राऊतांनी म्हटलं. संजय राऊतांच्या या विधानानंतर शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा- “काहींना माईक हातात आल्यावर…”, ‘त्या’ विधानांवरून अजित पवारांचा उद्धव ठाकरेंसह फडणवीसांवर निशाणा
संजय राऊत हा महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा गुंड आहे. अडीच वर्षांपूर्वी त्यांनी ५५ आमदारांना शरद पवारांच्या झोळीत टाकलं, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली. ते ‘टीव्ही मराठी’शी बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुंडांची टोळी घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले, या संजय राऊतांच्या टीकेबद्दल विचारलं असता शहाजीबापू पाटील म्हणाले, “महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात मोठा गुंड म्हणून संजय राऊतांचं नाव घ्यावं लागेल. कारण त्यांनी अडीच वर्षापूर्वी गुंडगिरी आणि मोठी चोरी केली. शिवसेनेचे ५५ आमदार कसे शरद पवारांच्या झोळीत टाकले? हे आम्हाला कळालही नाही. हा माणूस खरा गुंड आहे. हा माणूस खरा चोर आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला चोर म्हणायचं काहीही कारण नाही. चोरी त्यांनीच केली होती. आधी भाजपा-शिवसेनेची युती होती, त्यामुळे आम्हाला बहुमत मिळालं. पण रातोरात काळंबेर करून सगळं बिघडून टाकलं.”