काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर यांचा सत्कार सोहळा सांगोल्यात आयोजित करण्यात आला होता. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर रविवारी ( ७ मे ) टीका केली होती. याला आता शहाजीबापू पाटील यांनी आज ( ८ मे ) प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोले राजकारणातील कमी बुद्धी असलेले प्रदेशाध्यक्ष आहेत, अशी टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.
नाना पटोले काय म्हणाले होते?
शहाजीबापू पाटलांच्या काय झाली, काय डोंगर या विधानावरून नाना पटोलेंनी राज्य सरकारवर टीकास्र सोडलं होतं. “तुम्हाला काय झाडी, काय डोंगरवाला आमदार आणि राज्य सरकार पाहिजे की रवींद्र धंगेकरांसारखा इमानदार माणूस हवा,” असं नाना पटोले म्हणाले होते.
हेही वाचा : “राष्ट्रवादी हा साडेतीन जिल्ह्यांचा पक्ष”, फडणवीसांच्या वक्तव्यावर शरद पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…
याबद्दल शहाजीबापू पाटलांना प्रसारमाध्यमांनी विचारलं असता त्यांनी भाष्य केलं आहे. “सध्या अडचण अशी आहे, आपल्या माणदेशी भाषेत एक म्हण आहे, ज्याला खालचं वरचं कळत नाही, त्याला कारभारी केलं आहे. नाना पटोलेंना कोळं कुठं, करगनी कुठं, नाराळं कुठं, अकलूज कुठं माहिती आहे का? काँग्रेसला अध्यपदासाठी माणून नसल्याचे पटोलेंना बसवलं आहे. राजकारणातील अतिशय कमी बुद्धी असलेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले आहेत,” अशी टीका शहाजीबापू पाटलांनी नाना पटोलेंवर केली आहे.
हेही वाचा : “अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं आम्हाला वाटतं, पण शरद पवार अन्…”, राष्ट्रवादीच्या आमदाराचं विधान
संजय राऊत आणि नाना पटोले यांच्यात वाद सुरू आहे, असं विचारल्यावर शहाजीबापू पाटील म्हणाले, “राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांचं नेमकं काय आहे? सोनिया गांधींचं नेतृत्व नाकारून शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. शिवसेनेचा अजेंडा भगव्या झेंड्याचा आहे. ही सगळी विचित्र माणसं फक्त एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या द्वेषासाठी एकत्र येऊन काम करत आहेत. द्वेषातून केलेलं काम टिकणार नाही. तिकीट वाटपावेळी यांच्या चिंधड्या होऊन जाणार आहेत.”