सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्याचे शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू राजाराम भोसले-पाटील यांनी बंडखोरी करणारे शिवसेनेचे नेते आणि विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भविष्यात नक्की एकत्र येतील असं मत व्यक्त केलं आहे. “काय झाडी… काय डोंगार… काय हाटील… एकदम ओके” या आठ शब्दांमुळे महाराष्ट्रातील कनाकोपऱ्यात पोहचलेल्या शहाजीबापू यांनी बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना हे विधान केलं आहे.
नक्की पाहा >> Photos: सोमय्यांनंतर शिंदे गटाकडून नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांना थेट इशारा; म्हणाले, “उद्धव ठाकरे, ‘मातोश्री’वर…”
एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का या प्रश्नावर बोलताना शहाजीबापू यांनी, “यावर नाही म्हणू शकत नाही,” असं सांगितलं. “त्यांनी २५ वर्ष एकत्र काम केलं आहे. ते एकमेकांचे शत्रू नाहीत. सध्याचा निर्णय हा परिस्थितीचा असून सत्तेचा नाही,” असंही त्यांनी सांगितलं. तसेच, “उद्धव ठाकरे हे टप्प्या टप्प्याने विचार करुन भविष्यात शिवसेना एकजुटीने काम करताना दिसेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नक्की वाचा >> ‘जेव्हा जेव्हा शिवसेना फुटली त्यामागे शरद पवार होते’ म्हणणाऱ्या केसरकरांवर आव्हाड संतापले; म्हणाले, “२०१४ ला मीच…”
त्याचप्रमाणे, “शिंदे गटातील आमदारांना शिंदे आणि ठाकरे यांनी एकत्र यावं असं १०० टक्के वाटतं,” असंही शहाजीबापू म्हणाले. “उद्धव ठाकरे, रश्मी वहिनी आणि आदित्य ठाकरे हे सर्व आमदारांच्या काळजात आहेत,” असं वक्तव्यही सांगोल्याचे आमदार असणाऱ्या शहाजीबापूंनी केलं.
खरी शिवसेना कोणाची या वादावरही यावेळी शहाजीबापू यांनी भाष्य केलं. “आमच्या गटाकडे बहुमत आहे. शिवसेनेच्या ५५ आमदारांपैकी सर्वाधिक आमदार आमच्या गटात आहेत. निर्णय घेताना याचा विचार विधानसभेचे अध्यक्ष आणि सर्वोच्च न्यायालय नक्की करेल,” असा विश्वास शहाजीबापू यांनी व्यक्त केलाय. तसेच पुढे बोलताना, “आम्ही कालही शिवसेनेत होतो, आजही आहोत आणि उद्याही राहणार,” असंही शहाजीबापू म्हणालेत.
नक्की वाचा >> “…तर दीपक केसरकरांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरेंची भांडी घासावीत”; निलेश राणे शिंदे गटाच्या प्रवक्त्यांवर संतापले
“आमचीच शिवसेना खरी असल्याचं आम्ही मानतो, असं सांगतानाच पुढील काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रातील जनता शिंदेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करेल,” असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.