मराठा आरक्षणावरून महाराष्ट्रात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष सुरू झाला आहे. कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना ओबीसीतून आरक्षण दिलं असल्याने राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी त्यास विरोध केला आहे. मराठा आरक्षणासाठी एका बाजूला मनोज जरांगे पाटील आंदोलन करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला, मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं नुकसान होईल, अशी भिती व्यक्त करत छगन भुजबळ ओबीसींचे मेळावे घेत आहेत. यामुळे राज्यात तणाव निर्माण होऊ लागला आहे. दरम्यान, भुजबळांनी असे मेळावे घेणं चुकीचं असल्याचं वक्तव्य शिवसेनेच्या शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे.
शहाजीबापू पाटील यांनी काही वेळापूर्वी विधीमंडळाबाहेर प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. यावेळी ते म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे. मी या मागणीचा कडवा समर्थक आहे. मराठा समाजातील तरुणांची आरक्षणासाठीची तीव्रता वाढत चालली आहे. त्यामुळे याचा उद्रेक होण्याअगोदर आरक्षणाचा निर्णय होणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार लवकरात लवकर याबाबतचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे यांच्यातल्या संघर्षावर शहाजीबापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले, मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी मेळावे घेतले म्हणून छगन भुजबळांनीदेखील तसेच मेळावे घेणं हे चुकीचं असून अशा प्रकारे युद्ध सुरू करण्याची गरज नव्हती. भुजबळ हे राज्यातले ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेटमधील मंत्री आहेत. त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी मंत्रिमंडळाचं व्यासपीठ उपलब्ध होतं. परंतु, त्यांनी समाजात जाऊन प्रतिमेळावे घेणं चुकीचं आहे.
हे ही वाचा >> “मी एवढा अमानुष नाही”, मनोज जरांगेंच्या ‘त्या’ आरोपांवर छगन भुजबळांची प्रतिक्रिया; म्हणाले, “ती पिस्तुलधारी माणसं…”
आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, मराठा आरक्षणामुळे ओबीसींनी घाबरण्याचं कारण नाही. तुमच्यावर अन्याय करून मराठा समाजाला आरक्षण दिलं तर त्या दिवशी तुम्ही मेळावे घ्या. अजून तुमच्यावर अन्यायच झालेला नाही. आपल्यावर अन्याय होणार आहे असं गृहित धरून तुम्ही मेळावे का घेताय? भुजबळ यांचं प्रतिमेळावे घेण्याचं धोरण मला चुकीचं वाटतंय.