सातारा : साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी सायंकाळी शाही सीमोल्लंघन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या सोहळ्यात शिवपराक्रमावर पोवाडे, मर्दानी खेळ तसेच ऐतिहासिक उपक्रमांचा सहभाग होता. यामध्ये प्रशासनही सहभागी झाले.

खासदार उदयनराजे भोसले यांचे निवासस्थान जलमंदिर पॅलेस येथे युद्धकला प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. दुपारी पोलीस वाद्यवृंद, मानवंदना पथक, पोवाडा समूह, मर्दानी खेळ पथकांचे जलमंदिर पॅलेस येथे आगमन झाले. सायंकाळी जलमंदिर येथे उदयनराजे भोसले यांच्या हस्ते भवानी तलवारीचे पूजन करण्यात आल्यानंतर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने भवानी तलवारीला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीस जलमंदिरपासून प्रारंभ करण्यात आला. राजवाडा, मोती चौक, राजपथमार्गे शिवतीर्थाकडे प्रस्थान करणार आले. या मिरवणुकीत विविध वाद्यांसह घोडे, ऐतिहासिक वेशभूषा केलेले मावळे सहभागी झाले होते, हे या मिरवणुकीचे आकर्षण ठरले.

हेही वाचा – तुळजाभवानी मंदिरात सीमोल्लंघन सोहळा जल्लोषात, संबळाच्या निनादात मंदिर परिसरात जगदंबेच्या नावाचा जयघोष

हेही वाचा – Baba Siddique : बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या, राहुल गांधी यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले; “ही घटना…”

या मिरवणुकीत उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले व प्रशासनाचे अधिकारी तसेच नागरिक सहभागी झाले होते. सायंकाळी पालखीसोबत लोकप्रतिनिधी तसेच निमंत्रित शिवतीर्थकडे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन हे उपस्थित होते. शिवतीर्थ येथे भवानी तलवारीचे आगमन झाल्यावर येथे भवानी तलवारीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर भवानी तलवारीचे जलमंदिरकडे प्रस्थान झाले. जलमंदिर येथे उदयनराजेंच्या मातोश्री कल्पनाराजे भोसले व उदयनराजे भोसले आणि परिवाराच्या वतीने नागरिकांसोबत सोने लुटण्याचा कार्यक्रम झाला. यावर्षीही शासनाच्या प्रतिनिधींनी या सोहळ्यात सहभाग नोंदविल्याने या परंपरेचा सन्मान झाला, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.