डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचा ११ वा दीक्षांत समारंभ शुक्रवार ( २४ फेब्रुवारी) रोजी माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत, कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. नवी दिल्ली येथील ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनरिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी’चे माजी संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके या समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून दीक्षांत भाषण करणार आहेत. यावेळी जम्मू-काश्मीरच्या पोलीस उपआयुक्त शाहीदा परवीन गांगुली, ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले आणि यांना डी. लीट. पदवीने सन्मानित केले जाणार आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचा- “मी बाळासाहेब ठाकरे स्कूलचा विद्यार्थी, रामभाऊ म्हाळगी…” संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला
अकराव्या दीक्षांत समारंभात एकूण ५२० विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी प्रदान केली जाणार आहे. यावेळी ८ विद्यार्थ्याना सुवर्ण पदकाने गौरवण्यात येणार आहे. डॉ नवनाथ शंकर पडळकर या विद्यार्थ्याला संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठ एक्सलन्स इन रिसर्च अवार्ड जाहीर करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
जम्मू-काश्मीरच्या पोलीस उपआयुक्त शाहीदा परवीन गांगुली यांना सन्मानानीय डी.लीट पदवीने गौरविण्यात येणार आहे. १९९५ मध्ये त्या जम्मू- काश्मिर पोलीस दलात उपनिरीक्षक म्हणून रुजू झाल्या. स्पेशल ऑपरेशन ग्रुपचे नेतृत्व करताना दहशतवाद्याविरोधात त्यांनी अनेक मोहिमा यशस्वी केल्या. तब्बल ९० दहशतवाद्यांचा त्यांनी खातमा केला आहे. शहीद जवानांचे कुटुंबीय, अनाथ आणि विधवा यांच्यासाठी त्या काम करतात. महिलांवरील अत्याचाराविरोधातील त्या आवाज बनल्या असून मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देतात. शाहिदा परविन चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देशभरात महिला सबलीकरणासाठी त्या काम करतात.
हेही वाचा- “पहाटेच्या शपथविधीमुळे एकच चांगली गोष्ट घडली ती म्हणजे…” शरद पवार यांचं मोठं वक्तव्य
वसंत भोसले हे राज्यातील ज्येष्ठ पत्रकार आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक ज्ञानाचा प्रसार, स्त्री मुक्ती चळवळ यामध्ये त्यांनी सक्रीय सहभाग घेतला असून तंबाखू उत्पादक शेतकऱ्याच्या आंदोलनातही ते सहभागी होते. त्यानंतर ते पत्रकारितेकडे वळले. केसरी, पुढारी, सकाळ व त्यानंतर लोकमत या दैनिकांमध्ये बातमीदार, उपसंपादक, आवृत्तीप्रमुख ते संपादक अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहे. ‘पीपल्स पॉलीटिक्स’ या नियतकालिकाचे संपादकपदही त्यानी भूषवले आहे. ‘सह्याद्रीचा वारसा’ या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले असून ‘यशवंतराव चव्हाण- नव महाराष्ट्राचे शिल्पकार’ या पुस्तकाचे ते सहसंपादक आहेत.