देशात एकीकडे महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष, कर्नाटक निवडणूक निकालावर जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे द केरला स्टोरीवरही अनेक क्रिया प्रतिक्रिया येत आहेत. या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला असून पश्चिम बंगाल, तमिळनाडूसारख्या राज्यांनी या चित्रपटावरच बंदी आणली आहे. यावरून ठाकरे गटाने महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारवर ताशेरे ओढले आहेत. शिवसेनेच्या जडणघडणीत शाहीर साबळेंचे योगदान आहे, परंतु ते एकनाथ शिंदेंना माहिती नसेल असं म्हणत केरला स्टोरीचे तुणतुणे वाजवत भाजपावाले फिरत आहेत, अशीही टीका संजय राऊतांनी केली. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातील रोखठोक या सदरात संजय राऊतांनी टीका केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“‘द केरला स्टोरी’ ‘कश्मीर फाईल्स’प्रमाणे वादग्रस्त ठरवली. हा संघाचा सरळ अजेंडा आहे. गुजरात दंगलीवर बनवलेल्या एका डॉक्युमेंटरी फिल्मवर भारतीय जनता पक्षाने बंदी घातली, पण त्याच वेळी ‘कश्मीर फाईल्स’, ‘केरला स्टोरी’सारख्या चित्रपटांचा प्रचार ते करीत आहेत. चित्रपटाचे कथानक निर्घृण आहे. भारतातून ‘इसिस’मध्ये सामील झालेल्या मुली किती निर्दयपणे लोकांच्या हत्या करतात, गळे चिरतात, कोथळे काढतात व त्या सगळय़ास हिंदू-मुसलमान असा रंग देऊन राजकीय पक्ष हिंदुत्वाच्या गर्जना करतात”, असं संजय राऊत म्हणाले.

“भाजपने, मोदी-शहांनी त्या चित्रपटाचा वापर भाजपच्या प्रचारासाठी केला. मोदींसह सगळेच झुंडी झुंडीने ‘कश्मीर फाईल्स’ पाहायला गेले. महाराष्ट्रात श्री. देवेंद्र फडणवीस यांनी शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ हा चित्रपट पाहिला की नाही? पण त्यांनी वाजतगाजत ‘प्रोपोगंडा’ करत ‘केरला स्टोरी’ पाहिला आणि महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी वणवण भटकणाऱ्या, महाराष्ट्राला जाग आणण्यासाठी डफावर थाप मारणाऱ्या शाहिरांकडे पाठ फिरवली. मुख्यमंत्री शिंदे हे सातारचे. शाहीर साबळेंसारखी महान विभूती साताऱ्यात जन्मास आली व महाराष्ट्राच्या निर्मितीत त्यांचे मोलाचे योगदान होते. शिवसेनेच्या जडणघडणीतही ते होते. याची माहितीही सातारच्या मुख्यमंत्री शिंदे यांना नसेल, पण ‘केरला स्टोरी’चे तुणतुणे वाजवत आज भाजपवाले फिरत आहेत”, अशी टीका संजय राऊतांनी केली.

हेही वाचा >> Video: कर्नाटकात भाजपाच्या पराभवाची ५ प्रमुख कारणं गिरीश कुबेर यांच्या शब्दांत!

हे आव्हान कोणी स्वीकारेल काय?

“मुळात केरळाची खरी स्थिती काय आहे? केरळात खरेच हिंदू व ख्रिश्चन मुली इस्लामच्या शिकार बनत आहेत का? 32 हजार हिंदू व ख्रिश्चन मुलींना ‘इसिस’मध्ये भरती केले यात तथ्य आहे काय? ‘लव जिहाद’च्या बहाण्याने फसलेल्या निरपराध मुलींना अमानुष हत्यारे बनण्यासाठी मजबूर केले गेले का? इराक, सीरिया, अफगाणिस्तानच्या मार्गाने पुढे सरकलेली ‘केरला स्टोरी’ ही खरेच वास्तव आहे का? हा सगळाच संभ्रम आहे.काँग्रेस नेते शशी थरूर यांनी अत्यंत स्पष्टच सांगितले, 32 हजार महिलांनी इस्लाम धर्म स्वीकारला व त्या अतिरेकी झाल्या असे कोणी सांगत असतील तर त्यांनी याबाबतचे पुरावे समोर आणावेत व माझ्याकडून 1 कोटी रुपये इनाम घेऊन जावे. हे आव्हान कोणी स्वीकारेल काय?”, असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

हेही वाचा >> अग्रलेख : ‘बजरंगा’चा प्रकोप!

ही केरला स्टोरीची सत्य घटना

“‘केरला स्टोरी’ सत्य घटनेवर आधारित असल्याचे दिग्दर्शक सुदीप्तो सेनचे म्हणणे आहे. सत्य असेलही, पण ते इतके अमानुष पद्धतीने कसे दाखवता येईल? ‘कश्मीर फाईल्स’मध्येही तीच अमानुषता होती. ‘केरला स्टोरी’च्या दिग्दर्शकाचा दावा आहे, ’32 हजार मुलींचे लव्ह जिहाद व धर्मांतर झाले. आम्ही त्या भूमिकेवर ठाम आहोत.’ सुदीप्तो सेन यांनी केरळचे तत्कालीन मुख्यमंत्री ओमान चंडी यांच्या एका मुलाखतीचा हवाला पुरावा म्हणून दिला. एका मुलाखतीत ओमान चंडी यांनी सांगितले होते की, केरळात प्रत्येक वर्षी 2800-3200 मुली इस्लामचा स्वीकार करतात. गेल्या 10 वर्षांत हा आकडा 32 हजारांवर गेला आहे. या मुली आतंकवादाकडे वळवल्या गेल्या हे कसे उघड झाले? अफगाणिस्तानात तालिबानची धर्मांध राजवट पुन्हा आली. तेव्हा तेथील तुरंगात चार भारतीय महिला कैदी मिळाल्या. तपासात उघड झाले की, या चारही महिलांना ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी अफगाणिस्तानात पाठवले होते. आपापल्या पतीबरोबर या चारही महिला ‘इसिस’मध्ये सामील होण्यासाठी खुरासान प्रांतात पोहोचल्या, पण त्यांच्या नातेवाईकांनी हिंदुस्थान सरकारकडे विनंती केली की, त्यांच्या मुलींना ‘इसिस’च्या तावडीतून सोडवून हिंदुस्थानात आणा, पण हिंदुस्थान सरकारने ते मान्य केले नाही. त्यानंतर त्यांना अफगाणिस्तानातील तुरंगातच राहावे लागले.ही ‘केरला स्टोरी’ची सारांश कथा आहे!”, असं स्पष्टीकरण संजय राऊतांनी दिलं.

“देशात राजकीय उलथापालथीची शक्यता आहे. सरकारे येतील व सरकारे गडगडतील. त्या सगळय़ा गदारोळात ‘केरला स्टोरी’ खरी की खोटी, हा प्रश्न अधांतरी राहू नये.’कश्मीर फाईल्स’ हा भाजपचाच प्रोपोगंडा चित्रपट होता. ‘केरला स्टोरी’ म्हणजे ‘कश्मीर फाईल्स’चीच पुढली पायरी! पण या सगळय़ात राष्ट्रीय ऐक्य, सामाजिक सद्भावना कोठे हरवून गेली?”, असा प्रश्नही राऊतांनी यानिमित्ताने विचारला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shahirs contribution to the formation of shiv sena but playing the tune of the kerala story sanjay rauts take on the shinde fadnavis government sgk
Show comments