शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेतील बंडखोरी, महाविकासआघाडीचं सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकारची स्थापना यावरून मविआच्या नेत्यांवर जोरदार टोलेबाजी केली. “एकनाथ शिंदेंनी कुणाच्या स्वप्नातही नव्हती अशी राजकीय क्रांती केली आहे,” असं मत शहाजीबापू पाटलांनी व्यक्त केलं. तसेच त्यावेळी शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील सगळे मुंबईत असूनही आमदार निघून गेले, असं म्हणत खोचक टोला लगावला. ते गुरुवारी (८ सप्टेंबर) सांगली जिल्ह्यातील मिरज येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

शहाजीबापू पाटील म्हणाले, “एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात स्वप्नातही नव्हती अशी राजकीय क्रांती झाली आहे. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे मुंबईतच होते. असं असताना मुंबईतून पटापट आमदार निघून गेले आणि त्यांनी एक क्रांती घडवून आणली.”

“आम्ही गुवाहटीत असताना या सर्वांनी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला”

“या क्रांतीचा या सर्व लोकांना राग आला आहे. त्यामुळे आम्ही गुवाहटीत असताना या सर्वांनी महाराष्ट्र पेटवण्याचा प्रयत्न केला. आमदारांच्या घरासमोर बसणे, दगडं मारणे, घरं जाळणे, घरं फोडणे असे सर्व प्रकार झाले. संजय राऊतांची वक्तव्यं सर्वांनी ऐकली. एवढं करुन त्यालाही फार काही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर आता ते नव्याने प्रयत्न करत आहेत. या टीका होतच असतात. ते आमच्यावर टीका करतील आणि आम्हीही त्यांच्यावर टीका करू,” असं मत शहाजीबापू पाटील यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : ‘उद्धव ठाकरेंनी माफी मागावी’ म्हणणाऱ्या भाजपाला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, “लादेनला समुद्रात दफन केलं, तसं याकूब मेमनला…”

“इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना आणि…”

“राजकारणात सहन करत हळूहळू जनतेची कामं करायची असतात, सेवा करायची असते. साधुसंतांनी आणि मोठमोठ्या नेत्यांनी आपल्याला हेच शिकवलं आहे. त्यामुळे खोक्याची कल्पना ज्यांनी आयुष्यभर खोकी सांभाळली त्यांच्या डोक्यातून आली आहे. इथं आम्हाला पेटी बघायला मिळेना आणि विरोधक खोके दाखवत आहेत,” असं म्हणत शहाजीबापूंनी त्यांच्यावरील खोक्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं.

Story img Loader