मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलेल्या मनोज जरांगे पाटील यांना आता शाहू महाराज छत्रपती यांचाही पाठिंबा मिळाला आहे. काही वेळापूर्वीच शाहू महाराज छत्रपती यांनी आंतरवली सराटी गावात जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. मराठा कुणबी एकच आहेत सगळ्यांचा व्यवसाय शेती आहे आणि सरकारला आरक्षण द्यावंच लागेल असं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले शाहू महाराज छत्रपती?
एक पुरावा मिळाला तरी पुरतो, १५ हजार पुरावे पुष्कळ झाले आहेत. जाळपोळ वगैरे जास्त झाली. आपली ताकद वाढली पाहिजे यासाठी जे करायचं आहे ते केलं पाहिजे. सरकसट आरक्षण आपल्याला मिळणारच आहे. सरकारला ते द्यावं लागेल. सरकारला ही मागणी मान्य करावीच लागेल. कुणबी, मराठा हे सगळे एकच आहेत. सगळ्यांचाच व्यवसाय शेती आहे असं शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे. मराठा आणि कुणबी एकच ही आमचीही भावना आहे असंही शाहू महाराज छत्रपती यांनी म्हटलं आहे. आज सरकार या प्रश्नी बैठकही घेतं आहे. आता अपेक्षा करु की सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करेल. मी मराठा समाजातल्या बांधवांना विनंती करतो की कुणीही आत्महत्या करु नये.
आम्ही तुमच्या पाठिशी आहोत
आरक्षणाच्या लढाईत आम्ही पूर्ण ताकदीने तुमच्या पाठिशी आहोत असंही आश्वासन शाहू महाराज छत्रपती यांनी मनोज जरांगे पाटील यांना दिलं आहे. जे आरक्षण मिळेल ते सरसकट मिळालं पाहिजे. मी मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीचा आदर करतो असंही शाहू महाराज छत्रपतींनी म्हटलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरुच ठेवणार अशी भूमिका घेतली आहे. पाणी प्यायचं त्यांनी मान्य केलं आहे. त्यांचा लढा सुरुच आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी काय म्हटलंय?
मी महाराजांचा सन्मान करतो. मी रोज पाणी पितो ज्याप्रमाणे महाराज म्हणाले. मात्र पुढच्या दोन दिवसांत आरक्षण मिळालं नाही तर मी पाणी पिणं सोडणार. माझ्या दृष्टीने समाज महत्त्वाचा आहे. समाजाच्या हितासाठी मी आंदोलन करतो आहे. कुठल्याही प्रकारचं अर्धवट जीआर मी स्वीकारणार नाही. अध्यादेशही स्वीकारणार नाही. सध्या सरकार जे बोलतं आहे ते अर्धवट आहे. आम्ही अर्धवट आरक्षण आम्ही स्वीकारणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.