Shaina NC Criticise Arvind Sawant : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रंगत चढत जातेय. आरोप-प्रत्यारोप अन् टीका-टिप्पण्यांना उत आलाय. दरम्यान, आपल्या उमेदवारांसाठी मतदारांना आकर्षित करण्याकरता विरोधकांबाबत अपशब्दही वापरले जात आहेत. भायखळा लोकसभा मतदारसंघाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबादेवी विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना (एकनाथ शिंदे) उमेदवार शायना एन. सी. यांच्याबाबत अपशब्द वापरला आहे. यावरून शायना एन. सी यांनीही त्यांना शाब्दिक चपराक लगावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अरविंद सावंत काय म्हणाले?

मुंबादेवी मतदारसंघातून काँग्रेसच्या अमिन पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचा प्रचार करण्याकरता अरविंद सावंत २९ ऑक्टोबर रोजी त्यांच्या मतदारसंघात गेले होते. शायना एन. सी याआधी वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छूक होत्या. परंतु, त्यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. याबाबत बोलताना अरविंद सावंत म्हणाले, “त्यांची अवस्था पहा. त्या आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि आता शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षात आल्या. पण इथे इम्पोर्टेड चालत नाही. आमच्या इथे ओरिजनल माल चालतो.”

शायना एन. सी. यांचं प्रत्युत्तर काय?

इम्पोर्टेड आणि ओरिजनल माल शब्द वापरल्याने शायना एन. सी यांनी संताप व्यक्त केला आहे. आज त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर वक्तव्याचा निषेध केला. यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्या वक्तव्याची क्लिपही माध्यमांना ऐकवून दाखवली. त्या म्हणाल्या, “त्यांच्या पक्षाची विचारधारा यामुळे स्पष्ट होतेय. ते एका महिलेला माल म्हणतात. मी त्यांना विचारू इच्छिते की मुंबादेवीची प्रत्येक महिला माल आहे का? २०१९, २०१४ ला ते मोदींचं नाव लावून जिंकून आले आहेत. त्यांची सुरुवात तिथून झाली. आज २०२४ च्या निवडणुकीत ते मला माल म्हणतात. त्यांची मनस्थिती यामुळे स्पष्ट होते. त्यांच्या पक्षाचे नेतृत्त्व का गप्प आहेत? उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले यांनी आता बोललं पाहिजे”, असं त्या म्हणाल्या. त्या पुढे असंही म्हणाल्या की, “मी याबाबत कायदेशीर पाऊल उचलेन किंवा नाही. पण एका महिलेला माल म्हणणाऱ्यांचे जनता नक्की हाल करेल.”

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत त्या म्हणाल्या, “हे तेच अरविंद सावंत आहेत ज्यांच्यासाठी आम्ही २०१४, २०१९ मध्ये प्रचार केला. लाडक्या बहिणीप्रमाणे प्रचार केला. आता पाहा त्यांची मनस्थिती, विचार पाहा. ते जेव्हा म्हणतात ही महिला माल आहे. मालचा अर्थ आयटम. या शब्दाचा वापर तुम्ही केला माल, हेच मतदार तुम्हाला बेहाल करणार. सक्षम महिलेचा सन्मान करू शकत नाही, अपशब्द वापरले जातात.”

दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाच्या चर्चेत शायना एन. सी. या वरळीतून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात लढतील अशी चर्चा होती. परंतु, ऐन वेळेला तेथील उमेदवार बदलण्यात आला. राज्यसभेचे खासदार मिलिंद देवरा यांना वरळीतील जागा देण्यात आली. तर, शायना एन. सी. यांना मुंबादेवी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली. मुंबदेवी मतदारसंघ शिवेसना (एकनाथ शिंदे) पक्षाकडे गेल्याने शायना एन. सी यांनी भाजपातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि तेथूनच उमेदवारी अर्ज भरला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shaina nc criticise arvind sawant over mal derogatory word sgk