धाराशिव: महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास गुरूवार, १८ जानेवारी रोजी घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. नवरात्रापूर्वीच्या मंचकी निद्रेस दर्शवेळा अमावस्येच्या दिवशी प्रारंभ झाला होता. गुरूवारी पहाटे देवीची मंचकी निद्रा संपून सिंहासनावर देवीच्या मूर्तीची पुन्हा प्रतिष्ठापना आणि घटस्थापना होणार आहे. २५ जानेवारी रोजी घटोत्थापन व २६ जानेवारी रोजी महाप्रसाद आणि रात्रीच्या छबिना मिरवणुकीने नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.
तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्रोत्सव १८ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली. गुरुवार, ११ जानेवारी रोजी तुळजाभवानीच्या मंचकीनिद्रेने शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. या दिवशी सायंकाळची अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री नऊ वाजता तुळजाभवानीच्या मंचकीनिद्रेस प्रारंभ होणार आहे. यानंतर गुरूवार, १८ जानेवारी रोजी ही मंचकीनिद्रा संपून पहाटे तुळजाभवानीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना केली जाईल. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर यजमान भोपे पुजारी यांच्या हस्ते शाकंभरीची घटस्थापना व ब्राह्मण वृंदास अनुष्ठानची वर्णी देण्यात येणार आहे. १९ जानेवारी रोजी सकाळची व रात्रीची अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री देवीचा छबिना तर २० जानेवारी रोजी सकाळी देवीची नित्योपचार अभिषेक पूजा झाल्यानंतर विशेष अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. यानंतर २४ जानेवारीपर्यंत दररोज वेगवेगळ्या विशेष अलंकार महापूजा मांडल्या जातील. २४ जानेवारी रोजी अलंकार महापूजेनंतर होमावर अग्निस्थापना होऊन होमहवनास प्रारंभ करण्यात येणार आहे. २५ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकांभरीचे घटोत्थापन, नित्योपचार अलंकार महापूजा, रात्री छबिना व महंताचा जोगवा तसेच २६ जानेवारी रोजी देवीची नित्योपचार अभिषेक अलंकार पूजा होऊन अन्नदान महाप्रसाद व रात्रीच्या छबिन्याने शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता होईल. यंदा शाकंभरीचे यजमानपद हे भोपे पुजारी यांच्याकडे असणार आहे.