धाराशिव – तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवास येत्या १८ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. तत्पूर्वी ११ ते १७ जानेवारी दरम्यान देवीची नवरात्रापूर्वीची मंचकी निद्रा आणि १८ तारखेला देवीच्या मूर्तीची सिंहासनावर प्राणप्रतिष्ठापना आणि घटस्थापनेने नवरात्रौत्सव सुरू होणार आहे. २५ जानेवारी रोजी घटोत्थापन व २६ जानेवारी रोजी महाप्रसाद आणि रात्रीच्या छबिना मिरवणुकीने नवरात्रौत्सवाची सांगता होणार आहे.
येथील तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र उत्सव ११ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली. गुरुवार, ११ जानेवारी रोजी तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेने शाकंभरी नवरात्र उत्सवास प्रारंभ होणार आहे. या दिवशी सायंकाळची अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री नऊ वाजता तुळजाभवानीच्या मंचकी निद्रेस प्रारंभ होणार आहे. यानंतर १८ जानेवारी रोजी ही मंचकी निद्रा संपून पहाटे तुळजाभवानीची सिंहासनावर पूर्ववत प्रतिष्ठापना केली जाईल. सकाळच्या अभिषेक पूजेनंतर यजमान भोपे पुजारी यांच्या हस्ते शाकंभरीची घटस्थापना व ब्राह्मण वृंदास अनुष्ठानची वर्णी देण्यात येणार आहे. १९ जानेवारी रोजी सकाळची व रात्रीची अभिषेक पूजा झाल्यानंतर रात्री देवीचा छबिना तर २० जानेवारी रोजी सकाळी देवीची नित्योपचार अभिषेक पूजा झाल्यानंतर विशेष अलंकार महापूजा मांडण्यात येणार आहे. यानंतर २४ जानेवारीपर्यंत दररोज वेगवेगळ्या विशेष अलंकार महापूजा मांडल्या जातील. २४ जानेवारी रोजी अलंकार महापूजेनंतर होमावर अग्निस्थापना होऊन होमहवनास प्रारंभ करण्यात येणार आहे. २५ जानेवारी रोजी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त शाकांभरीचे घटोत्थापन, नित्योपचार अलंकार महापूजा, रात्री छबिना व महंताचा जोगवा तसेच २६ जानेवारी रोजी देवीची नित्योपचार अभिषेक अलंकार पूजा होऊन अन्नदान महाप्रसाद व रात्रीच्या छबिन्याने शाकंभरी नवरात्रोत्सवाची सांगता होईल. यंदा शाकंभरीचे यजमानपद हे भोपे पुजारी यांच्याकडे असणार आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरचे शरद पवार गटाचे पहिले शिबिर शिर्डीमध्ये!
हेही वाचा – “पंतप्रधान मोदी सत्तेसाठी…”, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यावरून प्रणिती शिंदेंचा टोला
२१ जानेवारीपासून अलंकार महापूजा
नवरात्रोत्सव कालावधीत श्री तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार महापूजा मांडण्यात येतात. यानुसार यंदा २१ जानेवारी रोजी मुरली अलंकार विशेष महापूजा, २२ जानेवारी रोजी शेषशाही अलंकार महापूजा, २३ जानेवारी रोजी भवानी तलवार विशेष अलंकार महापूजा तर २४ जानेवारी रोजी महिषासूर मर्दिनी अलंकार महापूजा मांडली जाणार आहे.