महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी ठाण्याचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. या सभेत त्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटावर सडकून टीका केली. त्याचबरोबर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनाही टोला लगावला. राज यांनी सुषमा अंधारेंचा जुना व्हिडीओ दाखवून ‘लाव रे तो व्हिडीओ’ची झलक दाखवली. त्यापाठोपाठ सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. अंधारे यांनी आधी समाजमाध्यमांवर पोस्ट करून आणि त्यानंतर जाहीर सभेतून राज ठाकरेंवर टीका केली. अंधारे यांच्या या टीकेनंतर मनसेने त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंच्या ठाण्यातील सभेनंतर सुषमा अंधारे यांनी फेसबूकवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे, मिस्टर राज, तुमच्यात आणि माझ्यात एक फरक आहे. मी सामाजिक न्यायासाठी लढत आहे. तुम्ही मात्र कायम प्रोएस्टॅब्लिश भूमिका घेत आलात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या सगळ्यांनी मिळून दिलेल्या सुपारीमध्ये तुम्हाला पहिली सुपारी माझ्या नावाची मिळणे हा माझा विजय आहे.
सुषमा अंधारे यांच्या या टीकेला आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शालिनी ठाकरे म्हणाल्या, राज ठाकरे यांनी सुषमा अंधारे यांचं नाव घेतल्याने त्या आता हवेत उडू लागल्या आहेत. त्यामुळे त्या आता काहीही बोलू शकतात. मुळात त्यांना महाराष्ट्रात कोण ओळखतं? राज ठाकरेंनी त्यांचं नाव घेतल्यामुळे त्या सध्या हवेत उडत आहेत. राज ठाकरेंनी भर सभेत आपलं नाव घेतल्यामुळे त्यांना खूप प्रसन्न वाटतंय, त्यांच्यात खूप उत्साह आला आहे. त्यामुळे त्या आता काहीही बोलू लागल्या आहेत.
शालिनी ठाकरे म्हणाल्या, राज ठाकरेंनी सुषमा अंधारे यांचं नाव घेतलं यातच त्यांना मोठा विजय वाटतोय. मुळात त्यांना राज ठाकरे हे काय बोलले हे कळलच नाही. या बाईचा बुद्ध्यांक (IQ) किती कमी आहे हे त्यांच्या वक्तव्यांवरून कळतंय. राज ठाकरे या बाईबद्दल बोलतच नव्हते. ही बाई का म्हणून सगळं स्वतःवर ओढवून घेतेय? राज ठाकरेंनी तिचा उल्लेख करावा इतकी ती मोठी आहे का? ती राज ठाकरेंचं वक्तव्य स्वतःवर ओढवून घेतेय. मुळात राज ठाकरे यांनी तिच्याबद्दल बोलावं इतकी तिची लायकी नाही. ज्या प्रकारे तिने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती, ती टीका शिवसैनिक आणि आम्ही सर्व हिंदू बांधव कधीच विसरणार नाही.