महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी, माजी आमदार शालिनीताई पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीकास्र डागलं आहे. शरद पवारांशिवाय अजित पवारांना कोणी विचारात नाही. अजित पवारांनी भाजपात सामील व्हावे किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करावा. अन्यथा शरण जावे, असं वक्तव्य शालिनीताई पाटील यांनी केलं आहे. त्या ‘मुंबई तक’शी बोलत होत्या.
“शरद पवारांनी केलेलं बंड आणि अजित पवारांनी केलेल्या बंडामध्ये फरक आहे. तेव्हाचं बंड दोन पक्षांच्या मतभेदामुळे झालं होतं. तेव्हा ‘खंजीर खुपसला’ हा शब्दप्रयोग मी केला होता. मी बारामतीत जाऊन जाहीर सभा घेत शरद पवारांवर टीका केली होती. पण, राजकारणात राहण्यासाठी तेच विषय घेता येत नाहीत. अजित पवारांनी केलेलं बंड स्वत:च्या पक्षात केलं आहे. शरद पवारांनी पक्षातून बाहेर पडल्यानंतर पुलोद नावाची संघटना काढली होती. अजित पवार आणि छगन भुजबळ नवीन पक्ष स्थापन करणार का?” असा सवाल शालिनीताई पाटील यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा : राष्ट्रवादीच्या पक्षफुटीवर उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जसे दिसते, तसे…”
“…अन् तेव्हा अजित पवार भूमिगत झाले होते”
“शिखर बँकेतील २५ हजार कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी अजित पवार मुख्य आरोपी असून, गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने २०१९ साली दिले होते. तेव्हा आम्ही पोलीस आणि ईडीकडे गुन्हा दाखल केला होता. दहाव्या दिवशी ईडीने अजित पवारांना समन्स बजावलं. त्यानंतर अजित पवार भूमिगत झाले होते,” असा दावा शालिनीताई पाटील यांनी केला.
“शरद पवारांच्या कवचकुंडलांचा अजित पवारांनी त्याग केला”
“पण, आपले चुलते शरद पवार यांच्या जीवावर अजित पवार काही काळ फिरले. आता शरद पवारांचं संरक्षण नाहीसे झालं आहे. शरद पवारांच्या कवचकुंडलांचा अजित पवारांनी त्याग केला आहे. कर्णाची कवचकुंडले नाहीशी झाल्यावर त्याचं मरण निश्चित झालं होतं. मात्र, आता राजकीय आणि समाज जीवनातून उठण्याचं मरण निश्चित आहे,” असा हल्लाबोल शालिनीताई पाटील यांनी अजित पवारांवर केला आहे.
हेही वाचा : शरद पवार यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली; म्हणाले, “भविष्यात हा सैतान…”
“अजित पवारांकडे तीन पर्याय आहेत, एकतर…”
“काँग्रेसमधून बाहेर पडल्यावर शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. अजित पवारांना बाहेर पडायचं आहे, तर नवीन पक्ष स्थापन करावा. शरद पवारांच्या नावावर आणि नेतृत्वावर निवडून आला आहात. शरद पवारांशिवाय तुम्हाला कोणी विचारत नाही. अजित पवारांकडे तीन पर्याय आहेत. एकतर भाजपात सामील व्हावे किंवा स्वत:चा पक्ष स्थापन करावा. अन्यथा शरण जावे,” असं शालिनीताई पाटील यांनी म्हटलं आहे.