राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट महायुतीत सहभागी झाल्यापासून महायुतीत सर्वकाही आलबेल नाही अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिवसेनेचा शिंदे गट नाराज असल्याच्या बातम्या अलिकडेच पाहायला मिळाल्या. तसेच शिंदे गटातील जे आमदार मंत्रीपदाच्या प्रतीक्षेत होते ते अजूनही ताटकळत आहेत. त्यामुळे महायुतीत अजित पवार गट आणि शिंदे गटात संघर्ष असल्याचं बोललं जात आहे. अशातच राज्यातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये शिंदे गटाचं वर्चस्व आहे तिथे अजित पवार आणि त्यांच्या गटाचं राजकीय अतिक्रमण सुरू असल्याचं बोललं जात आहे. यावर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

साताऱ्यात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर शंभूराज देसाई यांनी प्रसारमाध्यमांशी बातचित केली. यावेळी काही पत्रकारांनी देसाई यांना प्रश्न विचारला की, शिंदे गटाची सत्ता असलेल्या जिल्ह्यांमध्ये अजित पवारांचं राजकीय अतिक्रमण सुरू असल्याची चर्चा आहे, शिंदे गटाची सत्ता असलेल्या जिल्ह्यांमध्ये अजित पवारांचे दौरे वाढले आहेत त्यावर काय सांगाल? या प्रश्नावर मंत्री शंभूराज देसाई प्रतिप्रश्न करत म्हणाले, कुठल्या जिल्ह्यात दौरे वाढलेत? सातारा जिल्ह्यात दौरे वाढलेत का?

मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, अजित पवार काल साताऱ्यावरूनच कोल्हापूरला गेले, परंतु साताऱ्यात आलेसुद्धा नाहीत. याच मार्गे ते कोल्हापूरला गेले, साताऱ्याचा पालकमंत्री म्हणून मी त्यांची वाट बघत होतो. उपमुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार हे पहिल्यांदाच साताऱ्याला येत आहेत म्हणून मी स्वागतासाठी वाट बघत होतो. मी जिल्हाधिकाऱ्यांना सांगून ठेवलं होतं, सारखं विचारत होतो, अजितदादा कधी येणार आहेत? किती वाजता सर्किट हाऊसवर येतील? त्यांच्या स्वागतासाठी मी बुके घेऊन ठेवला होता. परंतु, अजितदादा साताऱ्याला आलेच नाहीत.

हे ही वाचा >> “राहुल गांधींनी आता परिपक्व व्हायला हवं”, ‘त्या’ वक्तव्यावर शिवराज सिंह चौहान यांचं प्रत्युत्तर

मंत्री देसाई म्हणाले, तुम्ही (पत्रकार) म्हणताय तसं कोणाचंही कोणावर अतिक्रमण नाही. आम्ही तिघं सुखी संसार करत आहोत. आमचा चांगला संसार चाललाय. आम्ही तिघेही एकमेकांच्या विचाराने काम करतोय. कोणी कोणावर अतिक्रमण करत नाही. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करायचे हेच आमचं उद्दीष्ट आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shambhuraj desai answer on ajit pawar political encroachments in shinde faction ruled districts asc