Shambhuraj Desai on Satara district guardian minister : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात साताऱ्याचा दबदबा यावेळीही कायम आहे. सातारा जिल्ह्यातील आठ पैकी तब्बल चार मतदारसंघातील आमदार मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री झाले आहेत. याशिवाय एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांचेही मूळ सातारा जिल्ह्यातच आहे. त्यामुळे अर्धे अधिक मंत्रिमंडळ सातारा जिल्ह्यातील आहे. मात्र, यामुळे महायुतीसमोर एक मोठा पेच निर्माण झाला आहे. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी शिवसेना (शिंदे) भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार) रस्सीखेच चालू असल्याचे दिसत आहे. भाजपाचे शिवेंद्रसिंहराजे भोसले (सातारा), जयकुमार गोरे (माण), राष्ट्रवादीचे मकरंद पाटील (वाई) शिवसेनेचे शंभूराज देसाई (पाटण) हे आमदार कॅबिनेट मंत्री झाले आहेत. साताऱ्याच्या राजकारणावर शरद पवारांचे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं काही वर्षे प्राबल्य होते. परंतु, या जिल्ह्यात आता सर्वाधिक आमदार भाजपाचे आणि महायुतीचेच निवडून आले आहेत.
दरम्यान, भोसले, गोरे, पाटील व देसाई यांच्यात साताऱ्याच्या पालकमंत्रिपदासाठी रस्सीखेच चालू असल्याचं बोललं जात आहे. या चार मंत्र्यांमध्ये शंभूराज देसाई हे सर्वात वरिष्ठ असल्यामुळे त्यांनी अधिक जोर लावला आहे. मात्र, भाजपाला देखील या जिल्ह्यात आणखी हातपाय पसरायचे आहेत. त्यामुळे भाजपाही साताऱ्याच्या पालकमंत्रिपदावरून सहजासहजी दावा सोडण्याची शक्यता तशी कमीच आहे. दरम्यान, या सगळ्यावर राज्याचे नवनिर्वाचित पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा >> शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभूराज देसाई नाराज? म्हणाले…
साताऱ्याच्या पालकमंत्रिपदाबाबद शंभूराज देसाई काय म्हणाले?
शंभूराज देसाई म्हणाले, शिवसेनेच्या (शिंदे) सर्व आमदारांनी ठराव करून आमच्या पक्षातील कोणाला मंत्री करायचं, कोणाला कोणता विभाग द्यायचा, कोणाला कोणती जबाबदारी द्यायची, कोणाला कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद द्यायचं हे ठरवण्याचा अधिकार आमच्या पक्षाचे प्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे. त्यानुसार मंत्रिमंडळ निश्चित करण्यात आलं आहे. आम्हा सर्व नेत्यांबाबत, आमदारांबाबतचे निर्णय उपमुख्यमंत्री शिंदेच घेतील.
हे ही वाचा >> Raj and Uddhav Thackeray : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र, आदित्य आणि अमितही पोहचले; राजकीय चर्चांना उधाण
मंत्री देसाई म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये जी खाती शिवसेनेच्या वाट्याला आली त्याचं खातेवाटप देखील एकनाथ शिंदे यांनीच केलं आहे. आमच्या वाट्याला आलेली खाती येत्या एक-दोन दिवसांत आमच्याकडे सुपूर्द केली जातील. पुढील दोन दिवसांत आम्ही पदभार स्वीकारून राज्याच्या सेवेत दाखल होऊ. माझ्याकडे पूर्वी उत्पादन शुल्क राज्यमंत्रिपद होतं. नंतर मी कॅबिनेट मंत्री झालो. आता माझ्याकडे तीन नवीन विभाग देण्यात आले आहेत. पर्यटन. खणीकर्म आणि सैनिक कल्याण विभाग माझ्याकडे सोपवण्यात आला आहे. या तिन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन या विभागांच्या कामाला कशी गती देता येईल याचा मी आढावा घेणार आहे. पालकमंत्रिपदाबाबतचा निर्णय देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे व अजित पवार मिळन घेतील.