सध्या महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकीय वर्तुळात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवार व शरद पवार गटाच्या स्वतंत्र बैठका बुधवारी (५ जून) मुंबईत आयोजित करण्यात आल्या होत्या. यात बोलताना दोन्ही बाजूच्या नेत्यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट चर्चेत असताना दुसरीकडे शिवसेनेतील दोन्ही गट पुन्हा एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामुळे शिंदे गट ठाकरे गटापासून वेगळा झाला होता, तोच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा शिंदे गटाबरोबर सत्तेत बसला आहे. त्यामुळे शिंदे गटातले आमदार नाराज असून ते उद्धव ठाकरे यांच्याकडे परत जातील असं म्हटलं जात आहे.
भारतीय जनता पक्षाचे खासदार सुब्रह्मण्यम स्वामी यांनीदेखील शिंदे गटाबद्दल भाष्य केलं आहे. स्वामी बऱ्याचदा त्यांच्याच पक्षाविरोधात भूमिका मांडतात. दरम्यान, स्वामी यांनी बुधवारी केलेल्या एका ट्वीटची चर्चा सोशल मीडियावर आणि राजकीय वर्तुळातही पाहायला मिळत आहे. गेल्या वर्षभरापासून एकमेकांवर टोकाला जाऊन टीका करणारे शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता सुब्रह्मण्यम स्वामी यांनी व्यक्त केली आहे. आपल्या कानावर ही बाब पडल्याचं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
हे ही वाचा >> “लोक म्हणतील, असा अन्याय आमच्यावरही व्हावा”, रोहित पवारांचं खोचक ट्वीट; वळसे-पाटलांना केला ‘हा’ सवाल!
दरम्यान, या चर्चांवर आता शिवसेनेच्या शिंदे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं आहे. शभूराज देसाई म्हणाले, या केवळ अफवा आहेत. मुख्यमंत्र्यांनी आमदार खासदारांची बैठक बोलावली होती. तिथे या मोठ्या नेत्यांव्यतिरिक्त दुसरं कोणीही नव्हतं. त्यामुळे आमच्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे की जी चर्चा तिथे (बैठकीत) झालीच नाही, तिथे असं काही घडलंच नाही, त्या गोष्टी प्रसारमाध्यमांना कोण सांगतंय? मी माध्यमांना हात जोडून विनंती करतो की, तुम्ही आधी खात्री करा. आमच्या प्रवक्त्यांना आणि नेत्यांना विचारा. कारण आमदारांमध्ये कोणतीही नाराजी नाही. तसेच मुख्यमंत्रीही नाराज नाहीत.