Shambhuraj Desai and on Mangal Prabhat LodhaMaharashtra CM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून निकालाबाबतचे एक्झिट पोल देखील समोर आले आहेत. अनेक एक्झिट पोलमधून राज्यात महायुतीची सत्ता येईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाठोपाठ महायुतीमधील सर्वच नेत्यांनी दावा केला आहे की राज्यात आम्हालाच बहुमत मिळेल आणि आम्ही लवकरच राज्यात सरकार स्थापन करू. मात्र, राज्यात महायुतीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न उपस्थित केला जात आहे? त्यावर महायुतीमधील नेत्यांनी वेगवेगळ्या नेत्यांची नावं घेतली आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या निकालाआधीच महायुतीत मुख्यमंत्रिपदावरून रस्सीखेच चालू आहे का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली होती. मात्र आता महायुतीमधील नेत्यांनी लवचिकता दाखवण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटलं आहे की मुख्यमंत्रीपद आमच्याकडे आल्यास एकनाथ शिंदे राज्याचं नेतृत्व करतील. तर, भाजपाने देखील त्यास विरोध केला नाही.
शिवसेना आमदार व प्रवक्ते संजय शिरसाट म्हणाले, “आम्ही महायुती म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकीला सामोरे गेलो. आम्ही एकनाथ शिंदे यांचा चेहरा घेऊन निवडणूक लढवली. राज्यातील जनतेने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याला पसंती दर्शवली आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं की मुख्यमंत्रीपदावर एकनाथ शिंदे यांचा हक्क आहे. निकालानंतर तेच राज्याचे मुख्यमंत्री होतील अशी आम्हाला खात्री आहे. आम्हाला मनापासून वाटतं की तेच मुख्यमंत्री व्हावेत आणि ते होतील याची आम्हाला खात्री आहे”.
भाजपा नेत्यांची लवचिकता
यावर मंत्री व भाजपा नेते मंगलप्रभात लोढा म्हणाले, “एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर तिन्ही पक्षांमधील प्रमुख नेते एकत्र बसून चर्चा करतील व मुख्यमंत्रीपदाचा निर्णय घेतील. एकनाथ शिंदे मुख्यमत्री झाले तरी आम्हाला आनंदच होईल. त्यांच्याऐवजी दुसरा एखादा नेता मुख्यमंत्री झाला तरी आम्हाला आनंद आहे. ही गोष्ट आमचे तीन प्रमुख नेते ठरवतील”.
दरम्यान, यावर आता शिवसेनेचे (शिंदे) नेते व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “जनतेचा, मतदारवर्गाचा, महिलावर्ग, शेतकरी, तरुणांचा प्रतिसाद पाहिला तर आलेले एक्झिट पोल हे जनतेचा कल पाहूनच आहेत हे स्पष्ट होतंय. निवडणुकीतील आमचा प्रचार, जनतेकडून मिळालेला प्रतिसाद, आलेले एक्झिट पोल पाहता असं वाटतंय की महायुती बहुमताच्या आकड्यापेक्षा बरीच पुढे जाईल आणि आम्ही मोठ्या बहुमताने सत्तेत येऊ. राहिला प्रश्न सरकारचं नेतृत्व कोण करणार याचा, तर तिन्ही प्रमुख पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. मित्रपक्षांनी देखील ही गोष्ट स्पष्ट केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र बसतील व मुख्यमंत्रीबदाबाबतचा निर्णय घेतील. शिवसेनेची देखील तीच भूमिका आहे. शिवसेना म्हणून किंवा शंभूराज देसाई म्हणून तुम्ही माझं वैयक्तिक मत विचारलंत तर मी सांगेन की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हायला हवेत. आमचं सर्वांचंच कायम हेच मत राहिलं आहे. मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे आल्यास आमच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे हेच सरकारचे प्रमुख व्हावेत असं माझं मत आहे.