चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई या दोन मंत्र्यांनी आपला नियोजित बेळगाव दौरा रद्द केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान एकीकडे चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी आपला दौरा रद्द केला असला तरी बेळगावजवळ हिरेबागवाडी टोल नाक्याजवळ कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. शंभूराज देसाई यांनीदेखील या हल्ल्यानंतर निषेध व्यक्त केला असून लवकरच आम्ही ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार आहोत, असे मत व्यक्त केले आहे. ते ‘टीव्ही ९ मराठी’शी बोलत होते.
हेही वाचा >>> मंत्र्यांचा बेळगाव दौरा रद्द झाल्याने अजित पवारांचा हल्लाबोल, म्हणाले “तक्रार काय करता? त्यांच्या अरे ला कारे…”
“महाराष्ट्र राज्य सामंजस्याची भूमिका घेत आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आम्ही आमचा बेळगावाचा दौरा पुढे ढकलला. मात्र काहीही कारण नसताना कर्नाटकमधील लोक महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करत आहेत. या हल्ल्यानंतर सीमाप्रश्न कोणाला चिघळवायचा आहे हे स्पष्ट झाले आहे. या हल्ल्याचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. या हल्ल्याचा धिक्कार करतो. त्यानंतर आता या घटनेच्या प्रतिक्रिया इतर टिकाणी उमटू नयेत, याची खबरदारी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. मी आपल्या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचित करणार आहे. महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे,” अशा शब्दांत शंभूराज देसाई यांनी आपला राग व्यक्त केला.
हेही वाचा >>> सुधीर मुनगंटीवार यांची मोठी घोषणा! सरकार शिवरायांच्या जगदंबा तलवारीसह वाघनखंही महाराष्ट्रात आणणार
“सहनशीलतेलाही काही मर्यादा असते. केंद्रीय गृहमंत्र्यांनी यामध्ये हस्तक्षेप करावा. कर्नाटकमधील या कारवाया थांबवाव्यात. आम्ही बेळगावमध्ये जाणारच आहोत. आम्ही आजच जाणार होतो. मात्र ६ डिसेंबर रोजीच्या महापरिनिर्वाणदिनाच्या कार्यक्रमात व्यत्यय येऊ नये म्हणून आम्ही आमचा दौरा पुढे ढकलला होता. कर्नाटक सरकारच्या कोणत्याही कारवायांना आम्ही भीक घालत नाही. आमच्या भावना केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत पोहोचवणार आहोत,” असेही शंभूराज देसाई म्हणाले.