लोकसत्ता वार्ताहर
वाई: जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्या नंतर सरकार विरोधात तीव्र असंतोष कमी होण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत, त्याचाच एक भाग म्हणून राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली
जालन्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज यामुळे राज्याचं राजकारण पुन्हा एकदा तापले आहे. विरोधकांकडून सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. मराठा आरक्षणाबाबत शासनाची भूमिका आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये सुरू असलेल्या सुनावणी बाबत माहिती देण्यासाठी मराठा आरक्षण समिती सदस्य या नात्याने उदयनराजे यांची भेट घेतल्याचे देसाईंनी सांगितले. यावेळी देसाई व खासदार उदयनराजे भोसले यांच्यामध्ये सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये देसाई यांनी न्यायालयामध्ये सुरू असलेली प्रक्रिया या विषयी माहिती दिली. तसेच आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजला देण्यात येणाऱ्या सवलती याबाबतही सविस्तर माहिती दिली.
आणखी वाचा-आंदोलकांवर लाठीहल्ला करणाऱ्या पोलीसांना निलंबित करावे – नरेंद्र पाटील
यावेळी मराठा समाजाने शांतता राखावी, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये व आरक्षणाच्या संदर्भात शासनास सहकार्य करावे, असे आवाहनही पालकमंत्री शंभुराज देसाई व खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.