राज्यात सध्या राजकीय अस्थिरता आहे. ती महाविकास आघाडी आणि शिंदे गट अशी दोन्हीकडं आहे. सत्ताधाऱ्यांमध्ये न्यायालयीन प्रकरणामुळे अडचण निर्माण झाली आहे. अलीकडे मोठा उठाव झाला आणि शिंदे गट निर्माण झाला. त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, याचा फटका सर्वसामान्यांना बसत असून, जनतेची गैरसोय होत आहे, असं विधान माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांनी केलं होतं. यावर आता मंत्री शंभूराज देसाई यांनी भाष्य केलं आहे.
‘टीव्ही ९ मराठी’शी बोलताना शंभूराज देसाई म्हणाले की, “सरकारमध्ये कोणतीही अस्थिरता नाही आहे. बच्चू कडूंना त्याची कल्पना आहे. १७० आमदारांचं बहुमत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या पाठिशी आहे. त्यामुळे कोणत्या अर्थाने अस्थिरता असल्याचं म्हटलं कल्पना नाही. राज्य सरकारची परिस्थिती भक्कम असून, विकासाच्या दृष्टीने शिंदे-फडणवीस सरकार काम करत आहे,” असं शंभूराजे देसाईंनी सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडीत अस्थिरता असल्याचंही विधान बच्चू कडू यांनी केलं होतं. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “विरोधीपक्षात कोणतीही अस्थिरता नाही आहे. सत्तारूढ पक्षात अस्थिरता असल्याचं महाराष्ट्र पाहतोय. तसेच, पिंपरी-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा करणार आहे. दोन-तीन दिवसांत याबद्दल ठरवू,” अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली.
हेही वाचा : विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश! मुख्य परीक्षा पॅटर्न २०२५ पासून राबवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची MPSCला विनंती
“निवडणूक आयोगासमोर सुनावणीमुळे…”
मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बोलताना बच्चू कडू यांनी सांगितलं की, “धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु आहे. म्हणून मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे ही सुनावणी पार पडल्यानंतर मंत्रीमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे,” असा दावा बच्चू कडू यांनी केला.